काबूलमधील हॉटेलवर तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला; ४३ ठार

2

सामना ऑनलाईन, काबूल

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरातील एका पंचतारांकित हॉटेलवर सशस्त्र दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री हल्ला केला. दहशतवाद्यांनी हॉटेलातील अनेकांना ओलीस ठेवले. सुरक्षा दले आणि दहशतवादी यांची १२ तास चकमक चालली. यात एका परदेशी व्यक्तीसह ४३ लोक ठार झाले. तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काबूल शहरातील टेकडीवर असलेल्या सहामजली इंटरकाँटिनेंटल हॉटेलवर शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. डायनिंग हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार करीत दहशतवाद्यांनी हॉटेलातील अनेक लोकांना ओलीस ठेवले. हॉटेलातील खोल्यांचे दरवाजे तोडून दहशतवाद्यांनी काही लोकांनी डांबून ठेवले होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यावर या हॉटेलच्या छतावर हेलिकॉप्टरमधून विशेष दलाचे जवान उतरले. नंतर त्यांनी सहाव्या मजल्यावर येऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराल सडेतोड उत्तर दिले. अफगाणच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना गोळीबारात ठार केले. या हल्ल्यात एक परदेशी व्यक्ती आणि पाच अफगाणी नागरिक ठार झाले, अशी माहिती गृह मंत्रालयाचे उपप्रवक्ते नसरत राहिमी यांनी दिली.

हल्ल्यात ठार झालेल्या परदेशी महिलेचा मृतदेह हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर आढळला. याच मजल्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. हल्ला झालेले हॉटेल विवाह समारंभ, परिषदा आणि राजकीय समारंभासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

तालिबानने जबाबदारी स्वीकारली

हॉटेलवरील हल्ल्याची जबाबदारी तालिबान संघटनेचे प्रवक्ते झाबीउल्लाह मुजाहिद याने एका ई-मेलद्वारे स्वीकारली आहे. काबूल शहरात ट्रक बॉम्बस्फोटात ३१ मे २०१७ रोजी १५० लोक ठार झाल्याच्या घटनेनंतर सर्वत्र सुरक्षा वाढवली आहे, मात्र तालिबान आणि इसिसचे हल्ले सुरूच आहेत.