कुडाळमध्ये रंगणार आजपासून राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

सामना क्रीडा प्रतिनिधी । कुडाळ

वासुदेवानंद ट्रेड सेंटर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आज 19 फेब्रुवारीपासून 47 वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 25 राज्ये व 13 संस्थांच्या तब्बल 288 पुरुष व 195 महिला खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

हिंदुस्थानातून जवळपास 40 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच तसेच प्रशिक्षक व राष्ट्रीय व राज्य संघटनेचे अधिकारी असे मिळून एकंदर 650 जणांचा चमू या स्पर्धेकरिता कुडाळमध्ये दाखल झाला आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर हे स्वतः स्वित्झर्लंड येथून या स्पर्धकारिता पाचही दिवस उपस्थित राहणार असल्याने या स्पर्धेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा मुख्य पुरस्कार या स्पर्धेला लाभला असून सारस्वत को-ऑप. बँक, ओ. एन. जी. सी., इंडियन ऑइल, बँक ऑफ महाराष्ट्रने ही स्पर्धा सहपुरस्कृत केली आहे. अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित या स्पर्धेचे यजमानपद यंदा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनला मिळाले आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता होईल. याप्रसंगी साऊथ कोरिया येथे विजयी झालेल्या हिंदुस्थानी संघाचा व सन 2017-18 सालाकरिता जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कारार्थी पंकज पवार व मेत्रेयी गोगटे या कॅरम खेळाडूंचा हिंदुस्थानी कॅरम महासंघ, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येईल. शुक्राचार्य महाडेश्वर व विठ्ठल धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळमधील सर्व कार्यकर्ते स्पर्धेची तयारी करत आहेत.