एकवीस मिनिटात 4833 स्ट्रोक, भुजबळांचा कपालभातीचा विक्रम


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई येथील प्रसिद्ध योग शिक्षक सुनील भुजबळ यांनी कपालभातीचा विक्रम केला आहे. सुनील यांनी 21 मिनिटामध्ये कपालभातीचे तब्बल ४ हजार 833 स्ट्रोक लगावून जागतीक विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा योग विद्या निकेतन या संस्थेने केला आहे. यापूर्वी 20 मिनिटामध्ये 2 हजार 600 स्ट्रोक लगावण्याचा विक्रम भोपाळ येथील महिलेने जून २०१७ मध्ये केला होता. परंतु विक्रम भुजबळ यांनी हा विक्रम मागे टाकल्याने त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

योगामध्ये कपालभाती हा प्रकार अतिशय अवघड आहे. मात्र हा प्रकार रोज केल्याने शरीर आणि मनाला शांती लाभते. या प्रक्रियेत फक्त श्वास बाहेर फेकून पोटाला झटके दिले जातात. यामुळे सामान्य योग साधक कपालभातीचे रोज 100 ते 500 इतकेच स्ट्रोक मारू शकतात. पण याचा नियमित सराव केल्यास यापेक्षाही अधिक स्ट्रोक मारता येतात हे रोजच्या सरावातून सुनील भुजबळ यांच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथील योग विद्या निकेतन या संस्थेत मुंबईतील माटुंगा रोड स्टेशनजवळील दामले योग केंद्रात सुनील भुजबळ यांचा कपालभातीचा कार्यक्रम २३ जूनला सकाळी आयोजित केला होता. त्यांनी सकाळी 8  वाजून 7 मिनिटांनी कपालभातीचे स्ट्रोक मारण्यास सुरुवात केली अन् सकाळी 8 वाजून 27 मिनिटांवर त्यांना थांबवण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी केलेल्या स्ट्रोकची तज्ज्ञांनी गणती केली त्यावेळी ते स्ट्रोक 4800 पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. योगतज्ञ श्रीधर परब यांनी हे जाहीर करताच दामले योग केंद्रातील योग साधकांनी टाळय़ांचा एकच कडकडाट करून भुजबळ यांचे अभिनंदन केले.

वीस मिनिटांत कपालभातीचे 4 हजार 833 स्ट्रोक मारण्याच्या सुनील भुजबळ यांच्या या कार्यक्रमासाठी योग तज्ञ म्हणून योग विद्या निकेतनचे तज्ज्ञ श्रीधर परब, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे राजपत्रित अधिकारी नरहरी चव्हाण, वरळी येथील दुग्धविकास विभागाचे उपायुक्त जगन्नाथ पाटील, दादरचे डॉ. ज्ञानेश म्हात्रे, डॉ. शर्वरी अभ्यंकर, या कार्यक्रमाचे समन्वय म्हणून चंद्रकांत खैरनार आणि योग साधक उपस्थित होते.