कश्मीरात ‘सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला ,पाच जवान शहीद

47

सामना ऑनलाईन, श्रीनगर

दक्षिण कश्मीरात अनंतनाग येथे केंद्रीय राखीव दलाच्या पथकावर (सीआरपीएफ) दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार करीत हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून, चार जवान जखमी आहेत. यावेळी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

अनंतनाग येथे के. पी. रोड या गजबजलेल्या परिसरात सीआरपीएफच्या जवानांच्या गस्त पथकाला दहशतवाद्यांनी टार्गेट केले मोटारसायकलवर आलेल्या दोन दहशतवाद्यांनी स्वयंचलित रायफलमधून बेछुट गोळीबार करीत ग्रेनेड हल्ला केला. त्यात पाच जवान शहीद झाले. चार जखमी जवानांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अनंतनाग पोलीस स्टेशनचे निरीक्षकही जखमी झाले. सीआरपीएफच्या 116 बटालियनचे हे जवान होते. दोन दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत एक दहशतवाद्याचा खात्मा केला. अल उमर मुजाहिद्दीनचा दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

अमरनाथ यात्रेच्या तोंडावर हल्ला

पुढील महिन्यात 1 जुलै रोजी पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालणार आहे. यात्रेला जाण्यासाठी अनंतनाग हा एक मार्ग आहे. 2017 मध्ये लष्कर-ए-तोयबाने यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता. त्यात आठजणांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या