दहिसरच्या गणेश भक्तांवर कोकणात काळाचा घाला

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

गणेशोत्सवासाठी उत्साहाने गावी निघालेल्या चाकरमानी गणेशभक्तांवर मंंगळवारी काळाने घाला घातला. राजापूरजवळच्या वाकेडघाटीत मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आराम बस आणि इको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मुंबई दहिसर येथील पाच जण जागीच ठार झाले. या अपघातात दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहानग्याचा समावेश आहे. या अपघातामुळे राजापुरातील कोंड्ये या गावावर शोककळा पसरली आहे.

दहिसर येथून राजापूर तालुक्यातील कोंडय़े येथे निघालेली इको कार राजापूरजकळच्या वाकेडघाटीत आली असता समोरून येणाऱ्या सुलोचना ट्रॅव्हल्सच्या आराम बसने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात इको कारचा चेंदामेंदा झाला असून या कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये  प्रियांका काशीराम उपळकर (21), पंकज हेमंत घाणेकर (19), भार्गवी हनुमंत माजळकर (सहा महिने), मानसी हनुमंत माजळकर (30) यांचा समावेश असून एका मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.