अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी उपनिरीक्षकासह पाच पोलिसांना १३ दिवस कोठडी

सामना ऑनलाईन । सांगली

अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व इतर चार जणांना तेरा दिवसांची म्हणजे २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्या न्यायालयात या आरोपींना प्रचंड मोठय़ा पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, आज दुसऱया दिवशीही सांगली शहरातील वातावरणात तणाव होता. जिल्हाधिकारी वि. ना. काळम-पाटील यांनी आज कोथळे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची कैफियत ऐकून घेतली.

चोरीच्या गुह्यात अटक करण्यात आलेल्या अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला होता आणि त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, पोलीस हवालदार अरुण टोणे, राहुल शिंगटे, वाहनचालक सूरज मुल्ला, झीरो पोलीस झाकीर पट्टेवाला या पाच जणांना आज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या पाचही आरोपींच्या तोंडावर बुरखे घालण्यात आले होते. न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहनांच्या ताफ्यासह अनेक अधिकारीही न्यायालय परिसरात दाखल झाले होते. सहा आरोपींपैकी हवालदार अनिल लाड याला आज आंबोली येथे अधिक तपासासाठी नेण्यात आल्याने त्याला आज सांगली न्यायालयासमोर हजर केले नाही; मात्र उर्वरित या पाच जणांना १३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची नोटीस
संशयित आरोपी अनिकेत कोथळे याचा सांगलीच्या पोलिसांकडून खून झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसचे उत्तर चार आठवडय़ांच्या आत द्या असे आदेश त्यांनी दिले आहेत. कोथळेच्या खुनाच्या बातम्या आज वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या त्यावरून ही नोटीस बजावली आहे.

हैवान पोलिसांचा सर्वत्र तीव्र निषेध
सांगलीतील ‘त्या’ पाचही हैवान पोलिसांचा सर्वच स्तरांमधून तीव्र निषेध होत आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱयांसह चोरीची फिर्याद देणाऱयाची चौकशी करण्याची मागणी सांगलीत शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या पोलिसांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांची बदली करण्यासह उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची खातेअंतर्गत चौकशी करावी. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याला संरक्षण देण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. कोल्हापुरातही शिवसेनेच्या वतीने कामटेच्या पुतळ्याला काळे फासले. याचा तपास सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.