कश्मीरात जबर धुमश्चक्री;पाच दहशतवाद्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन,श्रीनगर

कश्मीरात बडगाम व सोपोर येथे आज उडालेल्या धुमश्चक्रीत पाच अतिरेक्यांचा खात्मा झाला. लष्कराने एन्काऊंटर केलेल्या अतिरेक्यांची संख्या आता २०० झाली आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अतिरेक्यांच्या बचावासाठी रस्त्यावर उतरलेल्या फुटीरतावाद्यांनाही लष्कराने लाठय़ांचा प्रसाद दिला. फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीत तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

फुटलीपोरा येथे जैश ए मोहम्मदचे अतिरेकी दबा धरून बसल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलीस, सीआरपीएफ व लष्कराने संयुक्तरीत्या शोधमोहीम सुरू केली. सकाळी सात वाजता असदुल्ला नावाच्या एका ग्रामस्थाच्या घरात अतिरेकी असल्याचे कळताच परिसराची घेराबंदी करण्यात आली. अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन केल्यावर त्यांनी गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर देत दुपारी दोन वाजेपर्यंत चार अतिरेक्यांचे एन्काऊंटर करण्यात आले.  मारले गेलेले चारही अतिरेकी जैश ए मोहम्मदचे असून त्यापैकी तीन पाकिस्तानी तर एक स्थानिक असल्याचे सांगण्यात आले.

सोपोरमध्येही जबरदस्त चकमक

बडगाममध्ये चकमक सुरू होताच सोपोरमध्ये सगीपोरा येथे दडी मारून बसलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. जवानांनी घेरताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही तडाखेबंद प्रत्युत्तर देऊन एका अतिरेक्याला यमसदनी धाडले. हा अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. या चकमकीत एका कमांडोसह दोन जवान जखमी झाले.