गणरायाच्या मिरवणुकीत चोरट्यांचा ‘उत्सव’, गणेशभक्तांचे ५० मोबाईल लंपास

2

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

आज गुरुवारी गणरायाचे आगमन झाले. प्राणप्रतिष्ठेपूर्वी शहरात विविध भागांतून काढण्यात आलेल्या श्रीच्या मिरवणुकीत चोरट्यांनी ‘उत्सव’ साजरा केला. मिरवणूक ढोल-ताशांच्या तालावर बाप्पा मोरयाच्या घोषणा देत असतानाच चोरट्यांनी तब्बल ५० गणेशभक्तांचे मोबाईल लंपास केले. गणेशोत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त लावणाऱ्या पोलिसांसमोर आता या मोबाईल चोरांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

गणरायांचे आगमन असल्यामुळे सकाळपासून शहरातील विविध ठिकाणाचा बाजार फुलला होता. संभाजीपेठ, हडको कॉर्नर, गजानन मंदिर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सेव्हन हिल रोड, रामनगर, त्रिमूर्ती चौक, वाळूज महाराणा प्रताप चौक, पंढरपूर, मोहटादेवी यासह इतर भागांमध्ये गणरायाची मूर्ती घेण्यासाठी विविध गणेश मंडळे, गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

गणरायाची मूर्ती घेण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांकडून  गणरायाच्या जयजयकाराच्या घोषणा सुरू होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली. क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीपेठेतील जि.प. मैदानावर गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या एका गणेशभक्ताचा मोबाईल चोरट्याने मोठ्या शितफीने लंपास केला. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टी. व्ही. सेंटर, अविष्कार कॉलनी, कॅनॉट या परिसरातून ५ मोबाईल चोरीला गेले आहेत. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गारखेडा परिसरातील गजानन मंदिर, सेव्हन हिल रोड, शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौकातून ६ मोबाईल चोरट्याने चोरले. चिकलठाणा बसस्टॅण्ड, सिडको बसस्थानक परिसरातून तीन मोबाईल चोरट्याने चोरले असल्याची तक्रार एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दिली. पुंडलिकनगर, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. गणरायाच्या मिरवणुकीमध्ये आलेल्या अनेक भक्तांचे मोबाईल चोरीला गेले. मात्र त्यातील पोलिसांची कटकट नको म्हणत तक्रार देणे टाळले असल्याचे गणेशभक्तांनी सांगितले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गणरायाच्या उत्सवास गालबोट लागू नये म्हणून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी १७ पोलीस ठाण्याअंतर्गत कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, दीड हजार पोलीस कर्मचारी, विशेष शाखा, गुन्हे शाखेचा बंदोबस्त तैनात होता. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलीस गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत होते, तर पोलीस व्हॅनमधून गर्दीच्या ठिकाणची व्हिडिओ शूटिंग केली जात होती. पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरट्यांनी आपली हातसफाई दाखवलीच !