गुजरातमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीचा सांगाडा सापडला

सामना ऑनलाईन, राजकोट

गुजरातच्या कच्छ परिसरात 5200 वर्षांपूर्वीची दफनभूमी सापडली आहे. तिथे सहा फूट लांबीचा मानवी देहाचा सांगाडा आढळला आहे. हडप्पा संस्कृतीतील ढोलावीरा या शहरापासून ही दफनभूमी 360 किमी अंतरावर आढळली आहे.

पुरातत्व खात्याला दोन महिन्यांच्या अथक उत्खननानंतर प्राचीन दफनभूमी शोधून काढण्यात यश आले आहे. केरळ विद्यापीठ आणि कच्छ विद्यापीठाने संयुक्तपणे हे उत्खनन केलं आहे. गुजरातमधील इतर प्राचीन दफनभूमीहून ही दफनभूमी भरपूर वेगळी आहे. गुजरातमध्ये सापडलेल्या इतर सर्व दफनभूमी अर्धचंद्राकृती किंवा वर्तुळाकार होत्या. ही दफनभूमी मात्र आयताकृती आहे. या दफनभूमीत 250 कबरी असून त्यातील 26 कबरी खोदण्यात आल्या आहेत. या उत्खननामध्ये एक सहा फूट लांब देहाचा सांगाडा सापडला आहे. हा सांगाडा नक्की कोणत्या कालखंडातला आहे याचाही शोध सुरू आहे.

या उत्खननात सापडणाऱ्या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास केला जाणार असून तत्कालीन समाजजीवनाचा सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा अभ्यास केला जाणार आहे. तसेच इथे राहणाऱ्या लोकांचा हडप्पा संस्कृतीशी काही संबंध होता का, हेही शोधलं जाणार आहे. दफनभूमीसाठी वापरली जाणारी काळे ब्लॉक्स तयार करण्याचा कच्चा माल आणि तंत्र यांचा अभ्यासही केला जाणार आहे अशी माहिती कच्छ विद्यापीठाच्या पुरातत्व खात्याचे प्रमुख सुरेश भंडारी यांनी दिली.

बांगडय़ा आणि भांडीही आढळली

उत्खननात मानवी सांगाडय़ांशिवाय प्राण्यांचे अवशेषही आढळले आहेत. तसेच खडे, बांगडय़ा आणि काही अवजारंही सापडली आहेत. सुमारे 19 भांडीही मिळाली आहेत.  या पद्धतीची भांडी पाकिस्तानातील आमरी, नाल, कोट तसेच उत्तर गुजरातच्या नागवाडा, सुरकोटडा,  कच्छच्या धानेती भागांत यापूर्वी आढळली आहेत.