हिंदुस्थानातील ५१% महिलांमध्ये रक्ताची कमी

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानात बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढत असतानाच हिंदुस्थानातील तब्बल अर्ध्याहून अधिक महिला देखील कुपोषणाच्या विळख्यात अडकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हिंदुस्थानातील तब्बल ५१% महिलांच्या शरीरात रक्ताची फार कमी आहे. जागतिक आरोग्य परिषदेने केलेल्य एका सर्वेक्षणातूच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या अहवालानुसार सुदृढ महिलांच्या यादीत हिंदुस्थानचा शेवटचा क्रमांक असून पाकिस्तान व बांगलादेशदेखील हिंदुस्थानच्या पुढे आहेत.

जागतिक आरोग्य परिषदेने जगभरातील महिलांच्या आरोग्यावर एक सर्वेक्षण केले आहे. गेल्या वर्षी जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत १५ ते ४९ वयोगटातील १४० देशातील महिलांच्या आरोग्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अहवालानुसार हिंदुस्थानात ५१ टक्के महिलांच्या शरीरात रक्ताची कमी (अॅनिमिया) आहे. तर तब्बल २२% महिला या स्थूल आहेत. गरोदर महिला, बाळंत झालेल्या महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. २०१६ मध्ये हिंदुस्थानात ४८% महिलांमध्ये अॅनिमियाचा त्रास होता. मात्र याबाबत हिंदुस्थान सरकारने अद्याप ठोस पाऊल उचलेले नसल्याने गेल्या वर्षभरात हे प्रमाण तीन टक्क्यांनी वाढलेले आहे. पोषक आहाराच्या कमतरतेमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

या अहवालात बालकांबाबत दिलेल्या आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील तब्बल ३८ टक्के मुलांची वाढ अविकसित राहिली आहे. वाढत्या वयात पोषक आहार न मिळाल्याने या मुलांच्या उंचीवर, वजनावर आणि त्यांच्या मानसिक क्षमतेवर परिणाम होतो.