कराड दक्षिणेतील 52 गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश


सामना प्रतिनिधी । कराड

कराड दक्षिण मतदारसंघातील 52 गावांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत झाला असून, या गावात साकारण्यात येणार्‍या पाणी योजनांसाठी 30 कोटी 30 लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ.अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पेयजल योजना आराखड्यात या गावांचा समावेश झाला असून, या 52 गावांना लवकरच पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

कराड दक्षिण मतदारसंघात मुख्यमंत्री पेयजल योजनेतून रेठरे बुद्रुक, मुंढे, गोळेश्वरसह अनेक गावांमध्ये 24 बाय 7 नळपाणीपुरवठा योजना साकारल्या जात आहेत. तसेच मतदारसंघातील अन्य गावांमधील पाण्याची समस्या दूर व्हावी आणि या गावातील जनतेला शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या गावातील पाणीयोजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत करावा, अशी मागणी नामदार डॉ. भोसले यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. तसेच याबाबत सातत्याने शासनस्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरू होता.

दरम्यान, राज्यातील विविध गावांमधील पाण्याची समस्या लक्षात घेऊन शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने 2017-18 व 2018-19 असा संयुक्तपणे राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडा तयार केला. या आराखड्यात कराड दक्षिणेतील 52 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या गावांतील पाणीयोजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आकाईचीवाडी, घोणशी, हणमंतवाडी, हवेलीवाडी, जुळेवाडी, काले, कोयना वसाहत, मालखेड, सवादे, शेरे, वानरवाडी, वारूंजी, शिंदेवाडी विंग, गोंदी, कापील, बामणवाडी, कोळे, नांदलापूर, ओंडोशी, वडगाव हवेली, येवती, आणे आदींसह 52 गावांचा समावेश आहे. लवकरच याबाबतच्या निविदा प्रक्रिया व अन्य सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या पाणी योजनांच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत झाल्यामुळे त्या-त्या गावातील पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन नामदार डॉ. भोसले यांनी केले आहे. दरम्यान, अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने या 52 गावांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांनी मंत्री बबनराव लोणीकर व नामदार डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले आहेत.