बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँकेत 587 कोटींचा कर्ज घोटाळा

301

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक ऑफ इंडियातील 587.55 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनंतर गुजरातमधील फरार हिरे व्यापारी व ‘विनसम डायमंड्स’ कंपनीचा मालक जतिन मेहता याच्यावर सीबीआयने बँक कर्ज घोटाळाप्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

सीबीआयमध्ये नोंद झालेल्या तक्रारीनुसार जतिन मेहता याने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 323.40 कोटींचा, तर युनियन बँकेत 264.15 कोटींचा कर्ज घोटाळा केला आहे. सीबीआयने याप्रकरणी जतिन मेहता, त्याच्या ‘विनसम डायमंड्स ऍण्ड ज्वेलरी’ या हिरे कंपनीवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

‘विनसम डायमंड्स’चे मूळ प्रवर्तक मेहता, पूर्णवेळ संचालक रमेश पारिख आणि रविचंद्रन रामासामी, स्वतंत्र संचालक हरीश रतिलाल मेहता आणि जॉर्डनचा नागरिक हाथ्याम सलमान अली अबू ओबेदाह यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

जतिन मेहता याने एप्रिल 2011मध्ये कंपनीतील व्यवस्थापकीय संचालकपद सोडून घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच परदेशी पलायन केले. सध्या तो सेंट किट्स, कॅरेबियन बेटे येथे असल्याचे समजते.

महाराष्ट्र आणि युनियन बँकेसह 14 बँकांच्या मंडळाने मेहता व त्याच्या कंपन्यांना 4600 कोटींची क्रेडिट सुविधा दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या