हिंगोली-वाशीम रस्त्यावर भीषण अपघात, 6 ठार

1
jeep-accident-hingoli

सामना ऑनलाईन, हिंगोली

हिंगोली ते वाशीम या राज्यरस्त्यावर असलेल्या कलगाव पाटीजवळील अन्नपूर्णा शाळेसमोर भरधाव वेगातील ट्रकने देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप उडवली. या अपघातात सहा जण ठार झाले असून, दोघे जखमी झाले आहेत.  ही घटना शुक्रवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, जीपचा अक्षरश: चुराडा झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदर्भातील वाशीम येथील शुक्रवार पेठ भागातील रहिवासी गणेश लक्ष्मण हजारे (३५), नरसिंग सोपान हजारे (२८), सतीश नारायण मुरकुटे (२५), अनिल गजानन चव्हाण (२८) यांच्यासह राजू विष्णू धामणे (१८), स्वप्नील राम इरतकर (२५), सखाराम जिजेबा जाधव (३५), मदन जयाजी चव्हाण (३७, रा. सुरकुंडी, जि. वाशीम) हे आठजण जीपने हिंगोलीकडे देवदर्शनासाठी येत होते. मराठवाडा ते विदर्भाला जोडणाऱ्या हिंगोली-वाशीम राज्य रस्त्यावरील अन्नपूर्णा शाळेसमोर शुक्रवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ट्रकच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे      चालवून जीपला धडक दिली. या भीषण अपघातात जीपमधील गणेश लक्ष्मण हजारे, नरसिंग सोपान हजारे, सतीश नारायण मुरकुटे, अनिल गजानन चव्हाण यांच्यासह राजू विष्णू धामणे, स्वप्नील राम इरतकर हे सहाजण जागीच ठार झाले, तर सखाराम जिजेबा जाधव व मदन जयाजी चव्हाण हे दोघे जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारâती थोरात यांना समजताच, त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन राज्यमार्गावरून ये-जा करणाऱ्या ट्रकचालकांच्या मदतीने ठार झालेल्या व्यक्तींना व जखमींना जीपमधून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविले. गंभीर जखमी असलेल्या सखाराम जिजेबा जाधव व मदन जयाजी चव्हाण या दोघांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले, तर मयत सहाजणांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातलगांच्या हवाली करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच वाशीमवर शोककळा पसरली.