बुद्ध लेणीवर भीमसागर उसळला, लाखो भीमसैनिकांना वीजमंडळाचा शॉक

1

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनानिमित्त गुरुवारी बुद्ध लेणीवर भीमसागर उसळला. बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांनी या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात हजेरी लावून बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे अनुसरण केले.

दिवसभर आनंदात सुरू असलेल्या या सोहळ्याला वीज मंडळाने ऐन महत्त्वाच्या वेळेत १० मिनिटे अंधाराचा शॉक दिला. ही एक घटना वगळता हा सोहळा उत्साहात पार पडला. दिवसभरात सकाळपासून बुद्ध लेणीवर भीमसैनिकांचे जत्थेच्या जत्थे येत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठापासून बुद्ध लेणीवरील धम्मपीठापर्यंतचा रस्ता उपासक-उपासिकांनी फुलून गेला होता. दिवसभरात या ठिकाणी येणाऱ्या भीमसैनिकांसाठी भारतीय जनसंघर्ष सेनेतर्फे खिचडी वाटप करण्यात आले. परिसरात अनेक पुस्तकांची दुकाने, खाऊची दुकाने थाटली होती.

या परिसरात दिवसभरात मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकला. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २२ प्रतिज्ञा आणि भगवान गौतम बुद्धांच्या जीवनपटावर केलेले चित्र प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. या ठिकाणी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील यांनी भेट दिली. या व्यासपीठावर आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर आणि शासकीय कर्वâरोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांना भन्तेंच्या आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याच्या मुख्य धम्मपीठावर दिवसभर राजाभाऊ शिरसाट यांच्यासह नागसेन सावदेकर, राहुल अन्वीकर, अजय देहाडे, पंचशीला भालेराव, संजना खंडारे, कुणाल वराळे आणि अनेक गायकांनी बुद्ध-भीमगीतांनी भीमसैनिकांना मंत्रमुग्ध केले.

सोहळ्यासाठी धम्मभूमी येथील भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदन्त डॉ. सत्यपाल, नागसेन, डॉ. चंद्रबोधी, समस्त भिक्खू संघ, श्रामणेर संघ, दौलत मोरे, स्वागताध्यक्ष विजय मगरे आणि इतरांनी परिश्रम घेतले. रात्री उशिरापर्यंत भीमगीतांचा कार्यक्रम सुरू होता.