विखेंच्या मतदारसंघातून लोखंडेना 62 हजारांचे लीड

58

सामना प्रतिनिधी । नगर

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे 1 लाख 20 हजार मताधिक्क्याने पुन्हा निवडून आले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात लोखंडे यांना आघाडी मिळाली आहे. यात सर्वाधिक 62 हजार मतांचे मताधिक्क्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना केवळ अकोले मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे. तर श्रीरामपूरचे आमदार असून, स्वतःच्या मतदारसंघातून कांबळे 21 हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार कांबळे यांचा शिवसेनेचे लोखंडे यांनी 1 लाख 20 हजार मतांनी पराभव करून लोखंडे हे सलग दुसर्‍यांदा खासदार झाले आहेत. लोखंडे यांना 4 लाख 86 हजार, कांबळे यांना 3 लाख 66 हजार मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत लोखंडे हे 2 लाख 65 हजार मतधिक्क्यांने निवडून आले आहे. यंदा मात्र त्यांचे मताधिक्क्य घटले आहे. मतदारसंघातील कामे होत नसल्याने आणि लोखंडे मतदारसंघात येत नसल्याने अनेकदा नागरिकांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. परंतु, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे हे भाजपमध्ये दाखल होऊन नगरचे उमेदवार झाले. त्यामुळे लोखंडे यांच्या विजयाची जबाबदारी सुजय विखे यांनी घेतली होती. त्याप्रमाणे घडले ही राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघातून लोखंडे यांना सर्वाधिक 63 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. लोखंडे यांना शिर्डीतून सर्वाधिक 62 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

शिर्डी विधानसभेतून कांबळे यांना 40 हजार 890, तर लोखंडे यांना 1 लाख 3 हजार इतके मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून 13 हजार 677 इतके मते मिळाली आहेत. श्रीरामपूरचे आमदार असलेले कांबळे यांना मात्र स्वतःच्या मतदारसंघात 21 हजार मतांनी पिछाडीवर रहावे लागले आहे. कांबळे यांना केवळ अकोले विधानसभा मतदारसंघातून 31 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे कांबळे 7 हजार 625 मतांनी पिछाडीवर रहावे लागले आहे. थोरात यांनी कांबळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. त्याच ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर राहिला आहे. कोपरगावमध्ये 49 हजार, नेवाशामध्ये 19 हजारांचे मताधिक्क्य लोखंडे यांना मिळाल्याने ते विजयी झाले आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांची ताकद दिसून आले आहे. नेवासे, कोपरगावमध्ये भाजपचे आमदार असल्याने त्याचा लोखंडे यांना फायदा झाला आहे.

लोखंडे यांना विधानसभानिहाय मिळालेले मते
विधानसभा                                मते
अकोले                               49 हजार 514
संगमनेर                              82 हजार 216
शिर्डी                          1 लाख 3 हजार 761
कोपरगाव                             88 हजार 643
श्रीरामपूर                             86 हजार 639
नेवासे                                 72 हजार 676

कांबळे यांना विधानसभानिहाय मिळालेली मते
विधानसभा                                 मते
अकोले                              81 हजार 165
संगमनेर                            74 हजार 591
शिर्डी                               40 हजार 890
कोपरगाव                           49 हजार 344
श्रीरामपूर                            65 हजार 181
नेवासे                               52 हजार 942

आपली प्रतिक्रिया द्या