६४ वर्षांच्या आजीबाई झाल्या आई

सामना ऑनलाईन। बिजींग
चीनमध्ये एका ६४ वर्षांच्या महिलेने मुलाला जन्म दिलाय. ही महिला चीनमधली सगळ्यात वयोवृद्ध माता बनली आहे. चीनमधल्या जीलन या भागातील या महिलेची प्रसुती सिझेरियन करून करण्यात आली. या महिलेने एका मुलाला जन्म दिला असून त्याचं वजन ३.७ किलो इतकं आहे. या महिलेची ओळख मुद्दाम लपवून ठेवण्यात आलेली आहे.

baby-feet

या महिलेने तंत्रज्ञानाच्या आधाराने गर्भधारणा केली. चीनमधील एका वृत्तपत्राने याबाबत या नवजात मुलाच्या आईवडीलांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र या दोघांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.या वयोवृद्ध आईवडीलांच्या ओळखीच्यांनी मात्र या वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी सांगितलं की या जोडप्याने त्यांचं मूल आधी गमावलं होतं,त्यामुळे त्यांनी पुन्हा मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला.

गेल्या काही वर्षात उतारवयाकडे झुकणाऱ्या बऱ्याच महिला माता बनत असल्याचं चीनमधल्या काही डॉक्टरांचं निरीक्षण आहे.या ६४ वर्षांच्या महिलेच्या प्रसुतीसाठी मदत करणाऱ्या डॉक्टर तेंग होंग यांनी सांगितलं की या वयात मुलाला जन्म देणं ही मातेच्या आणि मुलाच्या दोघांच्या प्रकृतीसाठी एक अवघड आणि चिंताजनक बाब असते. मात्र या महिलेने धाडस दाखवून मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला, आणि तो निर्णय बरोबर ठरला असं या डॉक्टरांनी सांगितले आहे.