टेम्पो अडवून चालकाकडून 65 हजार लुटले

9


सामना प्रतिनिधी । चाकूर

द्राक्ष आणण्यासाठी सांगोला येथे जात असलेल्या निजामाबाद येथील व्यापाऱ्याचा टेम्पो अडवून अज्ञात चोरट्यांनी 65 हजार रूपये लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री मोहदळपाटी (ता.चाकूर) येथे घडली. लातूर-नांदेड महामार्गावर एका महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. निजामाबाद येथील इमामअली अशरफअली सय्यद हे व्यापारी टेम्पो घेऊन सांगोला (जि.सोलापूर) येथे द्राक्ष आणण्यासाठी निघाले होते. लातूर- नांदेड रस्त्यावरील मोहदळपाटीजवळ विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकवरील चार चोरट्यांनी टेम्पोला अडविले व काचांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. चालकास मारहाण करून टेम्पोत असलेले 65 हजार रूपये घेऊन चोरटे फरार झाले. याबाबत चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर महामार्ग पोलीस ठाणे असून चाकूर व लातूर पोलिसांची रस्त्यावर गस्त चालू असते या दरम्यान ही घटना घडली आहे. मागील महिन्यात अशाच प्रकारे व्यापाऱ्याची गाडी अडवून 75 हजार रूपये लुटल्याची घटना घडली आहे. त्याचा तपास सलुरू असताना ही दुसरी घटना घडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या