नांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या

सामना प्रतिनिधी ।  नांदेड

नांदेडमध्ये झालेल्या पोलीस भरती प्रकरणात काही गुन्हे दाखल झाले. काही परीक्षार्थ्यांसह त्यांना मदत करणाऱ्या अनेकांना आरोपी व्हावे लागले. पण अखेर त्या पोलीस भरतीत नवीन लेखी परीक्षा झाली आणि त्यानुसार पूर्ण तपासणी करून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी 66 पोलीस उमेदवारांना 16 नोव्हेंबर पर्यंत आपल्या कर्तव्यावर पोलीस मुख्यालय नांदेड येथे हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

पोलीस भरती 2018 मध्ये नांदेड जिल्ह्यात एकूण जवळपास 13 हजार अर्ज आले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा नांदेडमध्ये कार्यरत होते. पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सर्वच कामे इतरांच्या खांद्यावर ठेऊन निवांत बसलेल्या चंद्रकिशोर मीणा यांनी त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीवरून पोलीस भरतीमध्ये लेखी परिक्षेची उत्तर पत्रिका बदलण्याचा प्रकार घडला, असा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात त्यांना मदत करणाऱ्या, उत्तरपत्रिका तपासणीचे काम करणाऱ्या आणि परीक्षार्थी अशा अनेकांना आरोपी करण्यात आले. सन 2017 मध्ये पोलीस होऊन प्रशिक्षणार्थ असलेल्या काही युवकांना सद्धा या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने नांदेड पोलीस भरतीय प्रक्रियेतील लेखी परिक्षा रद्द केली आणि नवीन परिक्षा घेण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली झाली. पोलीस भरती प्रक्रियेतील पकडलेल्या अनेकांकडून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली, त्याची एकूण किंमत जवळपास 50 लाख रूपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता आरोपींविरूद्ध दोषारोप पत्र दाखल केले आहे. काही आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे आणि काही जण अद्यापही तुरूंगात आहेत.

नाव मोठे आणि …. अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्याचे कामकाज चालवत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली झाली मात्र पोलीस भरतीची अपुर्ण राहिलेली प्रक्रिया सध्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पुर्ण केली. सर्वात जास्त 163 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी ते त्यानंतर आरक्षीत जागानुसार खुल्या प्रवर्गातील 15, ओबीसी – 29, अनुसूचित जाती – 6, अनुसूचित जमाती – 5, एनटीसी – 4 आणि अनुकंपा – 7 अशा 66 उमेदवारांना पोलीस शिपाई या पदावर नियुक्त करण्याचे आदेश संजय जाधव यांनी जारी केले आहेत. नियुक्त झालेल्या 66 नवीन पोलिसांना उद्या दि. 16 नोव्हेंबर रोजी पोलीस मुख्यालयात हजर राहायचे आहे, अशा प्रकारे अखेर ग्रहण लागलेल्या पोलीस भरतीचे ग्रहण आज जारी झालेल्या पोलीस नियुक्ती आदेशानंतर समाप्त झाले आहे.