रत्नागिरी-सिंधुदुर्गात 67 टक्के मतदान

4

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले. आज सकाळी सात वाजल्यापासून १९४२ मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरु झाले. एकूण १४ लाख ५४ हजार ५२४ मतदारांपैकी ९ लाख ७४ हजार ५३१ मतदारांनी हक्क बजावला. यावेळी  शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आपण प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १४ लाख ५४ हजार ५२४ मतदार आहेत. त्यामध्ये ७ लाख ४२ हजार ४७८ महिला आणि ७ लाख १२ हजार ३४ पुरुष मतदार आहेत. १२ इतर मतदार आहेत. १९४२ मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. राणे, काँग्रेस आघाडीच्यावतीने नविनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक, समाजवादी फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राहत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भीकूराम पालकर, अपक्ष नारायण गवस, नीलेश भातडे रिंगणात आहेत.

मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. १९४२ मतदान केंद्रावर १० हजार ६८ कर्मचारी काम करणार आहेत. तसेच ३४६७ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामध्ये रत्नागिरीत एक पोलीस अधिक्षक, एक अपर पोलीस अधिक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, ८१ उपनिरीक्षक, १७०६ पोलीस कर्मचारी आणि सिंधुदुर्गात एक पोलीस अधिक्षक, एक अपर पोलीस अधिक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ९७उपनिरीक्षक, १५४७ पोलीस कर्मचारी सहभागी होते. राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, केंद्रीय पोलीस दलाच्या चार तुकड्या, गृहरक्षक दलाचे ७२६ कर्मचारी तैनात ठेवण्यात आल होते. यंदाच्या निवडणूकीत दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रॅम्प, वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गात ५८२८ दिव्यांग मतदार होते. सकाळी मतदानापूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिकाच्यावेळी रत्नागिरी तालुक्यांतील मिरजोळे गावातील हनुमान नगर आणि लक्ष्मीवाडी येथील मतदान केंद्रावरील यंत्र बंद पडले होते. मात्र त्यानंतर ते मतदान यंत्र बदलण्यात आले.

सकाळपासून उत्साह
आज सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. पहिल्या दोन तासात १०. २७ टक्के मतदान झाले. नऊ वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. ११ वाजेपर्यंत २१. ५९ टक्के मतदान झाले. अकरा वाजेपर्यंत मतदानाचा आकडा ३५. ६९ टक्क्यावर पोहचला. उन्ह वाढताच मतदानाचा वेग मंदावला. दुपारी तीन वाजेपर्यंत ४५. १० टक्के मतदान झाले. सायंकाळी चार नंतर मतदान केंद्रावर पुन्हा रांगा दिसल्या. पाच वाजेपर्यंत ५५. १० टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु होते. वयोवृध्द मतदारांनीही आज मतदानासाठी उत्साह दाखवला. एकूण सरासरी ६० टक्के मतदान झाले. त्यामध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ५९. २० टक्के, चिपळूण विधानसभा मतदारसंघात ५२. ७८, राजापूर विधानसभा मतदारसंघात ५१. ०२ टक्के, कणकवली विधानसभा मतदारसंघात ५४. ८२ टक्के, कुडाळ विधानसभा मतदारसंघात ६०. १७ टक्के, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६५ टक्के मतदान झाले.