अपघाताच्या दोन घटनांमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

सामना ऑनलाईन, मुंबई

नेवासा आणि वैजापूरजवळ झालेल्या अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. नगर-संभाजीनगर रस्त्यावर कांगोणीफाटा इथे ट्रॅव्हल्स आणि ट्रकची धडक झाल्याने अपघात झाला. बस ट्रकला धडकल्याचे प्राथमिक वृत्त आहे. नेवासे तालुक्यामध्ये घडलेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या 19 जणांना नगर आणि नेवासे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वैजापूर रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून त्यांची नावे वैभव कुंदे (२५), अर्जुन सोनवणे (२२), संतोष वाणी (२५) अशी आहेत.हे तिघेही कारमधून वैजापूरच्या दिशेने जात होते. समोरून येत असलेल्या ट्रकची आणि या तरूणांच्या गाडीची धडक झाल्याने या तिघांचा मृत्यू झाला आहे. अर्जुन आणि संतोष हे वैजापूरचे रहिवासी असून यातील संतोष हा कापडाच्या दुकानात काम करत होता. वैभव आणि अर्जुन हे दोघे एका खासगी रुग्णालयात काम करत होते अशी माहिती देण्यात आली आहे. अपघात झाला तेव्हा संतोष गाडी चालवत असल्याचीही माहिती मिळाली आहे.