मराठवाड्यात आत्महत्या सुरूच, ९ महिन्यांत ७२३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आत्महत्याग्रस्त ९२ शेतकऱ्यांचे वारस मदतीच्या प्रतीक्षेत

सामान प्रतिनिधी । संभाजीनगर

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करीत वाटचाल करीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. मराठवाडा विभागात ९ महिन्यांच्या कालावधीत ७२३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. आत्महत्या केलेल्या ४९९ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळू शकली. ९२ प्रकरणात शेतकरी वारस मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका मराठवाडा विभागाला सहन करावा लागत आहे. अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. नापिकी, सततचा दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत, हे अनेक निष्कर्षातून समोर आले आहे, तरीही राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करण्यास विलंब केला. घोषणेनंतरही अद्याप कर्जमाफीचा लाभ मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना होऊ शकलेला नाही, त्याच नैराश्याच्या भावनेतून शेतकरी आपली जीवन यात्रा संपवीत आहेत.

मराठवाडा विभागात ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये ७२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या या बीड जिह्यात झाल्या आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत १४३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या जिल्ह्यापाठोपाठ नांदेड जिह्यात १११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने एक लाखाची मदत केली जाते, तीही मदत देताना आत्महत्येची अनेक प्रकरणे मदतीस अपात्र ठरविली जात आहेत.

विभागातील आत्महत्या केलेल्या ७२३ पैकी ४९९ शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयेप्रमाणे ४ कोटी ९९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. असे असले तरीही आत्महत्या केलेल्यांपैकी १३२ प्रकरणे मदतीस अपात्र ठरविण्यात आली आहेत. उर्वरित ९२ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. आत्महत्याग्रस्त ९२ शेतकऱ्यांचे वारस मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वाधिक ३० प्रकरणे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ संभाजीनगर – १७, नांदेड – १५, धाराशिव – १३, परभणी – ८, लातूर – ५ आणि हिंगोली जिल्ह्यातील ४ वारसदार मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आत्महत्याग्रस्त ९२ शेतकऱ्यांचे कुटुंबीय उघडय़ावर आले आहेत. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या
                                   मदतीस        चौकशी
जिल्हा         आत्महत्या     पात्र     अपात्र     प्रलंबित
संभाजीनगर       ९८        ६३       १८        १७
जालना            ६५        ६२       ३         ००
परभणी            ९९        ६८       २३        ८
हिंगोली            ३८        २७       ७          ७
नांदेड             १११        ७७      १९         १५
बीड               १४३       ९९       १४        ३०
लातूर              ७१        ५३       १३         ५
धाराशिव           ९८        ५०       ३५        १३
एकूण             ७२३       ४९९     १३२        ९२