औट घटकेचे पोलीस निरीक्षक, कंधार आणि हादगाव पुन्हा रिकामे

सामना प्रतिनिधी । नांदेड

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी राज्यात आताच झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये काहीसा बदल करत काही पोलीस निरीक्षकांना नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि हदगाव हे दोन पोलीस ठाणे पुन्हा रिकामे होणार आहेत.

२२ जून रोजी निर्गमित झालेल्या ७४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये बहुतांश पोलीस निरीक्षकांच्या मे महिन्यात झालेल्या बदल्यांमध्ये थोडासा बदल करून नवीन नियुक्त्या करत पूर्वीच्या बदल्या रद्द केल्या आहेत. त्या ७४ पोलीस निरीक्षकांमधील नांदेड जिल्ह्यात आताच काही दिवसांपूर्वी नियुक्त्या मिळालेले दोन पोलीस निरीक्षक बदलून जाणार आहेत.

नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी परभणी येथील दादाहारी केशवराव चौरे यांना नांदेड जिल्ह्यात पाठवले होते.तसेच अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने नागपूर शहरातील पोलीस निरीक्षक उत्तम दादाराव मुळक नांदेड जिल्ह्यात आले होते २१ जून रोजी दादाहारी चौरे यांना हदगाव येथे नियुक्ती देण्यात आली होती. तसेच उत्तम दादाराव मुळक यांना कंधार पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती. पण नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या अनुक्रमे ठाणे शहर आणि संभाजीनगर शहर या ठिकाणी नियुक्ती झाल्याने आता त्यांची नियुक्ती औट घटकेची ठरली आहे. या ७४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये नांदेड येथे येणारा एकही पोलीस निरीक्षक नाही .तेव्हा आता पुन्हा एकदा कंधार आणि हदगाव हे पोलीस ठाणे चालवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी येणार आहे हे निश्चित आहे.