७५ हजार हिंदुस्थानींना अमेरिका सोडावी लागणार!

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. ‘एच-वन बी’ व्हिसा धोरणात बदलांना मंजुरी देऊन अंमलबजावणी झाली तर अमेरिकेतील तब्बल ७५ हजार हिंदुस्थानींची नोकरी धोक्यात येईल. या हिंदुस्थानींना मायदेशी परत येण्यावाचून पर्याय राहणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे.

सॉफ्टवेअर उद्योगाची संस्था नॅस्कॉमने व्हीसा नियमातील बदलांमुळे चिंता व्यक्त केली आहे. याबाबत नेस्कॉमने पुढाकार घेतला असून अमेरिकी प्रशासनाबरोबर चर्चा केली जाणार आहे.

काय होणार बदल?

  • राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निवडून येताच गेल्या वर्षी पहिल्यांदा ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’चा नारा दिला. नोकऱयांमध्ये अमेरिकन कंपन्यांनी आपल्या देशातील नागरिकाला प्राधान्य द्यावे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
  • अमेरिकेत शिक्षण आणि नोकऱयांसाठी दरवर्षी हजारो तरुण-तरुणी व्हिसासाठी अर्ज करतात. गेल्या वर्षी ६५ हजार विदेशी नागरिकांना अमेरिकेने ‘एच-वन बी’ व्हिसा दिला. त्यात सर्वाधिक हिंदुस्थानी आहेत.
  • ट्रम्प प्रशासनाने ‘एच-वन बी’ व्हिसाची शुल्क २००० डॉलरवरून ६००० डॉलर वाढविली आहे. तसेच एल-वन व्हिसाची शुल्क ४५०० केली आहे.
  • हिंदुस्थानातून जाणारे ‘आयटी’ तरुण-तरुणींना कमी वेतनात ‘हायर’ केले जाते. त्यामुळे अमेरिकन तरुणांना रोजगार आणि योग्य मोबदला मिळत नाही असा ट्रम्प प्रशासनाचा आक्षेप आहे.
  • नवीन बदलांनुसार अमेरिकन नोकऱया करण्यासाठी येणाऱया तरुणाला किमान वेतन किती हवे याचे काटेकोर नियम ‘एच-वन बी’मध्ये केले आहे.
  • हिंदुस्थानी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱयाला अमेरिकेत पाठवायचे असेल तर यापुढे जादा वेतन द्यावे लागेल तरच व्हिसा मिळेल.

काय परिणाम होणार?

  • २०१७ मध्ये ३४ लाख विदेशी नागरिकांनी एच-वन बी व्हिसासाठी अर्ज केले होते. त्यात सर्वाधिक २१ लाख हिंदुस्थानी होते.
  • अमेरिकेत सध्या सर्वाधिक ‘एच-वन बी’ व्हिसाधारक सॉफ्टवेअर उद्योगात आहेत. २० लाखांवर ही संख्या आहे.
  • सिलिकॉन व्हॅलीसह अमेरिकेच्या सर्व मोठय़ा सॉफ्टवेअर उद्योगात सर्वाधिक हिंदुस्थानी आहेत.

ग्रीन कार्डसाठी अर्ज प्रलंबित असल्यास सध्या ‘एच-वन बी’ व्हिसाची कालमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढविता येते. पण नवीन नियमात ही सुविधा नसेल. त्यामुळे ज्यांचे ग्रीन कार्ड प्रलंबित आहे अशा विदेशी कर्मचाऱयांचा एच-वन बी व्हिसा रोखला जाऊ शकेल. असे झाल्यास ५० ते ७५ हजार हिंदुस्थानींना मायदेशी परतण्याची वेळ येऊ शकते.