उघड्यावर शौचाला जाणाऱ्या कुटुंबाला ७५ हजारांचा दंड

सामना ऑनलाईन, भोपाळ

स्वच्छ भारत अभियानातंर्गत प्रशासन घराघरात शौचालय बांधण्यास प्रोत्साहन देत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील रामबखेडी ग्रामपंचायतीने उघड्यावर शौचास जाणाऱ्या एका कुंटुबाला ७५ हजार रुपयांचा दंड सुनावला असून ४३ कुटुंबांना नोटीस बजावली आहे.

गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीने या कुटुंबाला नोटीस बजावून उघड्यावर शौचास जाण्यास मनाई केली होती. त्याकडे कुटुंबाने दुर्लक्ष केल्याने काल त्यांना ग्रामपंचायतीने ७५ हजारांचा दंड ठोठावला. या कुटुंबात १० सदस्य आहेत. प्रत्येकाला दिवसाला २५० रुपये याप्रमाणे महिन्याचा दंड ठोठावल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले.