गतिरोधक न दिसल्यामुळे ७६ वर्षीय बाईकस्वाराचा अपघाती मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी मुंबई
रस्त्यावरच्या गतिरोधकाची खूण नसल्यामुळे झालेल्या झालेल्या भीषण अपघातात एका ७६ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. नोझेर आगा असं या बाईकस्वाराचं नाव असून ते कावासाकी निन्जा ही स्पोर्ट्स बाईक चालवत होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राने या अपघाताचं वृत्त दिलं आहे. आगा हे त्यांच्या बाईकवरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. जुन्या महामार्गावरून वेगाने जात असताना घोडिवलीजवळ रस्त्यावर गतिरोधकाची खूण नसल्यामुळे त्यांची बाईक गतिरोधकावर अडखळली आणि अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वेगाने आदळल्यामुळे आगा बाईकवरून उडाले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. इतक्या जोरात पडल्यामुळे त्यांच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला आणि त्यांनी जागीच प्राण सोडले.
आगा यांनी सुरक्षेची सर्व काळजी घेतली होती. अपघात झाला तेव्हा त्यांच्या अंगावर बाईक रायडिंगसाठी योग्य असलेली सर्व सामग्री होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य चुकीमुळे हा अपघात घडल्याचं त्यांच्या मुलाचं म्हणणं आहे. ‘आगा हे अत्यंत चांगले बाईकस्वार होते. वयाच्या नवव्या वर्षापासून ते बाईक रायडिंग करत. पण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन गतिरोधक रंगवला नव्हता आणि तिथे गतिरोधक असल्याचा बोर्डही उभा केलेला नव्हता. त्यामुळे हा अपघात झाला.’ असं त्याचं म्हणणं आहे.