लेप्टोचा ‘थयथयाट’; पेणमध्ये आठ बळी, आरोग्य विभागाची झोप उडाली

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पेण तालुक्यातील खारेपाट विभागात लेप्टोने थैमान घातले असून तीन आठवडय़ांत लेप्टोसदृश तापाने आठ जाणांचा बळी घेतला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लेप्टोची लागण झपाटय़ाने वाढत असून आणखई आठ रुग्ण सापडले आहेत. लेप्टोच्या या ‘थयथयाटा’मुळे खारेपाटामध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून या धोक्याच्या घंटेमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

पेण तालुक्यातील जिते, खारसापोली, रावे, कळवा, दादर या गावांमध्ये तापाची साथ पसरली असून तीन आठावडय़ांत आठ जाणांचा मृत्यू झाला आहे. तापाने आठ जणांचा बळी घेतल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक पाठवून या विभागतील रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यापैकी १० जणांच्या रक्ताचे नमुने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी आठ रुग्णांना लेप्टोची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या गावांमध्ये सध्या लेप्टोची दहशत पसरली आहे.

लेप्टो कसा होतो?

उंदिर, डुक्कर, गाई, म्हैशी, कुत्री यांच्या मूत्रामधून लेप्टोस्पायरोसीसचे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास या रोगाची लागण होते.

लक्षणे

लेप्टो तापाचा कालावधी चार ते १० दिवसांचा असतो. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, थंडी वाजणे, डोळे चुरचुरणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. बऱ्याच वेळा रुग्णांची लक्षणे किरकोळ  वा समजून न येणारी असतात. मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यू ओढवण्याची शक्यता असते.

हाय ऍलर्ट

पेण तालुक्यातील जिते, खारसापोली, रावे, कळवा, दादर ही गावे लेप्टो संवेदनशील असून येथे हाय अॅलर्ट लागू करण्यात आला आहे.  येथे भात कापणीच्या वेळी लेप्टोचे रुग्ण आढळतात. त्यामुळे आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केल्या होत्या. परंतु भात कापणी सुरू झाल्यापासून या भागामध्ये तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

त्वरित उपचार आवश्यक

मागील काही दिवसांपासून या भागांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णावर उपचार केले जात आहेत. तापाच्या रुग्णांचा सर्व्हे करण्यात येत आहे, रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. सर्व्हेमध्ये लेप्टोचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. सर्व तापाचे रुग्ण हे लेप्टो बाधित नाहीत. परंतु हा ताप लेप्टोसदृश आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पिरषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली. तसेच हातापायाला जखमा असल्यास त्यातून लेप्टाचे जंतू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे शरीराला जखमा असल्यास त्यावर त्वरित उपचार करून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.