Video : सेल्फीपायी बिबट्याचा जीव गेला, तिघांना अटक


अभिषेक भटपल्लीवार । गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील सड़क अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बिटमध्ये धक्कादायक घटना धडली असून सेल्फीपायी एका आठ महिन्यांच्या बिबट्याला जीव गमवावा लागला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी वन विभागाने कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असून शेतात जखमी झालेल्या अवस्थेत एक बिबट्याचे आठ महिन्यांचे पिल्लू झोपलेले असून काही ग्रामस्थ येऊन त्याच्यासोबत सेल्फी घेत मस्ती करत आहेत. तसेच यातील एकजण बिबट्याचे शेपूट पकडून त्याला फरफटत नेताना दिसत आहे. यानंतर बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने कारवाई करत प्रकाश पुराम, लोकेश कापगाते आणि आदिप गोंदिल या तीन ग्रामस्थांना अटक केली आहे. वन विभाग इतर आरोपींचा शोध घेत आहे.