फुगे मारल्यामुळे ओरडल्याने 12 वर्षांच्या मुलाने तरुणाला भोसकले

19


सामना ऑनलाईन, उल्हासनगर

12 वर्षांच्या एका मुलाने 16 वर्षांच्या तरुणाला सुऱ्याने भोसकल्याची धक्कादायक घडना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या तरुणाला मुलाने पाणी भरलेला फुगा मारला होता. यामुळे भडकलेल्या तरुणाने या मुलाला खडसावलं होतं. याचा राग आल्याने या तरुणाला लहान मुलाने भोसकलं आहे.

ही घटना मंगळवारची असून उल्हासनगरातील कँप नं.1 भागात घडली आहे. तरूणाला फुगा मारल्यामुळे तो या मुलाला ओरडला होता. याचा राग आल्याने तो मुलगा घरी गेला आणि चाकू घेऊन परत आला. त्याने तरुणाच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले आणि तिथून पळून गेला. जखमी तरुणाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं,तिथून त्याला नंतर केईएममध्ये दाखल करण्यात आलं.

या घटनेबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्राने जखमी तरुणाच्या भावाशी संपर्क साधला. तरुणाच्या मोठ्या भावाने सांगितलं की माझ्या भावाने त्या मुलाला फुगे मारू नको म्हणून सांगितलं होतं. तरीही तो मुलगा फुगे मारत होता ज्यामुळे माझा भाऊ त्याला ओरडला. माझ्या भावाने पोलिसांत तक्रार करेन असं सांगितल्यानंतर हा मुलगा भडकला आणि त्याने माझ्या भावावर वार केले. जखमी तरूण हा गरीब घरातील असून तो त्याच्या काकाच्या दुकानामध्ये काम करतो. तर हल्ला करणारा मुलगा हा 8 वी मध्ये शिकणारा आहे. या मुलाचे वडील हे रिक्षाचालक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या