श्यामची आई… मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र

शिबानी जोशी.

श्यामची आईअजरामर कलाकृतीआज ८१ व्या वर्षात पदार्पण करूनही श्यामच्या आईचे संस्कार चीरतरुण आणि सुंदर राहिले आहेत.

मराठी साहित्यातील ज्या काही कलाकृती अजरामर ठरल्या आहेत, कालातीत आहेत, कोणत्याही काळात त्या क्षय पावणाऱया नाहीत अशा साहित्यकृतीतील एक म्हणजे ‘श्यामची आई’ हे साने गुरुजी लिखित पुस्तक.

‘श्यामची आई’ या पुस्तकाला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. ८१ वर्षांचं पूर्ण वयोमान झालेल्या या पुस्तकाने मुलांना संस्कार करीत पिढय़ांपिढ्या घडवल्या आहेत. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असे साने गुरुजी म्हणत असत.

‘श्यामची आई’ या पुस्तकाचा यंदा ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळाच आहे असं म्हणायला हरकत नाही. यंदाच साने गुरुजींच्या आईचे ‘यशोदा साने’ यांचं हे शताब्दी वर्षही आहे. त्याच निमित्ताने ‘आई-मुलाच्या’ या नात्याला उजाळा देण्यासाठी ‘श्यामची आई’ हे पुस्तक पुन्हा एकदा वाचून काढले. कोणतंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा. मातेचा महिमा, पवित्र जिव्हाळा, सुसंस्कार वाचून बाळबोधपणाने आपले डोळे पाणावतात.

साने गुरुजींनी या पुस्तकात हृदयातील सारा जिव्हाळा ओतला आहे. मातेबद्दल असणाऱया प्रेम, भक्ती, कृतज्ञता अशा अपार भावना या पुस्तकात ठासून भरल्या आहेत. या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या. तीनवेळा आवृत्त्यांचं पुनर्मुद्रण करण्यात आलंय.

एक काळ असा होता की, घरात लहान मूल असेल तर त्याला ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट म्हणून दिलं जातच असे. प्रत्येक आई आपलं मूल सुसंस्कारित व्हावं म्हणून प्रयत्न करीतच असते. मुलाने ते कसे अंगीकारायचे हे आजूबाजूच्या परिस्थितीवर खूपसं अवलंबून असतं. श्याम आणि त्याची आई हे दोघंही आदर्श आहेत. त्यामुळे ‘श्यामची आई’ही अमर झालेय.

‘श्यामची आई’ या पुस्तकाने इतिहास घडवला. साधे शब्द, साधे विचार, साधी माणसं, साधी राहणी असूनही पुस्तक मात्र असाधारण ठरले.

तसं पाहिलं तर साने गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिले. लेख, निबंध, काव्य, चरित्रे, कादंबऱया अशा साहित्याच्या विविध प्रकारांत त्यांनी लेखणी चालवली. स्वतः वृत्तपत्रेही काढली. स्वतःचे समाजाविषयीचे विचार, स्वतःला आलेले अनुभव त्यांनी लेखनातून प्रकट केले. घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदयापासून रेखाटले, परंतु ‘श्यामची आई’ इतकी लोकप्रियता कोणाला मिळाली नाही. ‘श्यामची आई’या कथेवर अनेक कलाकार प्रेमात पडले. त्यावर चित्रपट आले, लघुपट आले, नाटक आलं. ‘श्यामची आई’ जशी आहे तशीच आजच्या काळातील ‘श्यामची मम्मी’ आहे हे सांगणारं नाटकही गाजलं, तर आचार्य अत्रे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटात काम करणाऱया वनमालाबाई म्हणजेच साक्षात श्यामची आई व माधव वझे हेच खरे  श्याम असं चित्रच रसिकांच्या डोळय़ासमोर उभं राहिलं. हेच ते खरं मातृप्रेम आणि हेच खरं मातृत्व असे पाहून पुढच्या दोन तीन पिढय़ा घडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाल्या.

खरं तर पुस्तकात कोणतेही उपदेशाचे डोस साने गुरुजींनी पाजले नाहीत, परंतु प्रत्येक प्रसंगात, जीवनात प्रेमाने कसं वागावं याचा प्रत्यय आपल्याला येत राहतो. भूतदया, मांजरीचं प्रेम, म्हातारीची गोळी, श्यामचे पोहणे, बंधुप्रेमाची शिकवण, सांबसदाशिव पाऊस पडू दे, आईचा शेवटचा आजार, सात्त्विक प्रेमाची भूक अशा छोटय़ा छोटय़ा कथांमध्ये सर्वसामान्य घरातले प्रसंगच वर्णिले आहेत. परंतु त्याकडे पाहायची सात्त्विक दृष्टी, लबाडपणा, खोटेपणा नसलेलं निर्मळ मन यामुळे ते प्रसंग आपल्या मनात ठसतात. ते प्रसंग आपण विसरूच शकत नाही.

आपल्याला वाटेल हा श्याम काय लहानपणापासून असाच आदर्श होता की काय? मग याचे लहानपण, निरागसपण हिरावून गेले असणार? तसंही नाही. श्वासही खुलायचा, घरून पळून जायचाही त्यात प्रयत्न केलेला दिसतो. आई पाठवत नाही म्हणून रुसतानाही दिसतो. परंतु प्रेमळ आईच्या समजूत काढण्यावर त्याला ते पटतं आणि आई आपल्या चांगल्यासाठीच हे करीत असणार असा त्याला ठाम विश्वास असल्यामुळे तो प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकतो हेच तर हे पुस्तक आपल्याला सांगतं.

आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाबद्दल लिहिताना त्याला ‘मातृप्रेमाचं स्तोत्र’ असं म्हटलं होतं. आजवर ‘आई’वर असंख्य लेखक, कवींनी जगातल्या सर्व भाषांत कवनं केली आहेत. परंतु अतिव मांगल्यानं आणि माधुर्यानं ओथंबलेलं असं महाकाव्य दुसऱया कोणत्या भाषेत असेल असं वाटत नाही असं अत्रे यांनी लिहून ठेवलं होतं.

‘श्यामची आई’ ही खरं तर सर्वसामान्य कोकणातली साधीसुधी आई; परंतु ती या श्याममुळे प्रसिद्धी पावली. कारण लेखक रक्ताची शाई करून लिहितात, पण साने गुरुजींनी हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहिले.

श्यामच्या आईनं आपल्या वागण्यातून त्याला गाईगुरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला शिकवलं, कोंडय़ाचा मांडा करून खायला शिकवलं, गरिबीतही आपलं स्वत्व आणि सत्त्व न गमविता राहायला शिकवलं ते आजच्या मातांना समाजाच्या वाढत्या रेटय़ामुळढे इच्छा असूनही सांगायला वेळ नसेल तर त्यांनी इतकंच करावं, ‘श्यामची आई’ पुस्तक आणून मुलांना रोज वाचून दाखवावं. यंदा या पुस्तकाला ८१  वर्षे पूर्ण होताहेत व यशोदा साने यांचे शताब्दी वर्षही आहे. त्यामुळे ‘श्यामची आई’चं वाचन हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल.