800 ग्राहकांची वीज तोडली: विशेष मोहिमेत अवघी 9 कोटींची वसुली

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्हाभरातील वीज ग्राहकांकडे तब्बल 3 हजार कोटींवर वीजबिल थकबाकी असली तरी ’महावितरण’ला आठ दिवसांच्या विशेष मोहिमेत यापैकी केवळ 9 कोटींची वसुली करता आली आहे. त्यामुळे आता वसुली मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या मोहिमेत महावितरणने 871 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी तोडून टाकला तसेच 2 हजार 686 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तोडला आहे. या मंडळींनी त्यांच्याकडील थकित वीजबिल भरले तर तो पुन्हा जोडला जाणार आहे.

महावितरणच्या जिल्ह्यातील 9 लाख 93 हजार 76 ग्राहकांपैकी 6 लाख 89 हजार 19 म्हणजेच जवळपास 69 टक्के ग्राहक थकबाकीदार असून, त्यांच्याकडे 3 हजार 72 कोटी 95 लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. त्याच्या वसुलीसाठी आठ दिवसांची विशेष वसुली मोहीम जिल्ह्यातील नगर शहर, नगर ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागीय कार्यालयांच्या स्तरावर राबवली गेली. यासाठी विशेष वसुली पथके स्थापन करण्यात आली होती. पण या मोहिमेतून अपेक्षेइतकी वसुली झालेली नसल्याने ही मोहीम निरंतर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महावितरण सूत्रांनी सांगितले.

41 हजारांवर ग्राहकांची तपासणी
विशेष वसुली मोहिमेत ’महावितरण’च्या पथकांनी जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांतील मिळून 41 हजार 757 ग्राहकांच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. या ग्राहकांकडे सुमारे 10 कोटी 30 लाखांची थकबाकी असल्याने त्यांच्या वसुलीवर जोर देण्यात आला. या ग्राहकांपैकी 38 हजार 200 ग्राहकांनी प्रतिसाद देऊन त्यांच्याकडील 8 कोटी 95 लाखांची थकबाकी जमा केली; मात्र, 85 लाखांची थकबाकी असलेल्या 2 हजार 686 ग्राहकांनी पैसे भरण्यास मुदत मागितल्याने त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला गेला. त्यांच्याकडून पैसे जमा झाल्यावर वीजजोड पुन्हा जोडून दिला जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तसेच 871 ग्राहकांपैकी काहींनी पैसे भरण्यास असमर्थता दाखवली तर काहींच्या घरी कोणी उपस्थित नव्हते. काहींची घरे-व्यवसाय बदलले गेले असल्याने या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी तोडला गेला. या मंडळींकडे 49 लाखांची थकबाकी आहे.

वाढती थकबाकी
’महावितरण’ची जिल्ह्यातील वीज थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. यात कृषी वीजपुरवठ्याच्या सर्वाधिक थकबाकीचा समावेश आहे. 3 लाख 60 हजार 153 शेतीपंप ग्राहकांकडे तब्बल 2 हजार 767 कोटी 53 लाख रुपये थकले आहेत. याशिवाय 2 लाख 81 हजार 737 घरगुती ग्राहकांकडे 37 कोटी 61 लाख रुपये तसेच 30 हजार 793 व्यावसायिक ग्राहकांकडे 33 कोटी 27 लाख रुपये थकबाकी आहे. यासह 6 हजार 883 औद्योगिक ग्राहकांकडून 5 कोटी 94 लाख रुपये येणे बाकी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजपुरवठ्याचेही पैसे थकले आहेत. जिल्ह्यात असे 2 हजार 320 ग्राहक असून, त्यांच्याकडून 61 कोटी 56 लाख रुपये येणे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील याच ग्राहकांना त्यांच्या गावांतील पथदिव्यांसाठी केलेल्या वीजपुरवठ्याचेही पैसे थकले आहेत. असे पथदिवे ग्राहक 3 हजार 527 असून, त्यांच्याकडे 164 कोटी 98 लाख रुपये थकले आहेत. इतर छोट्या-मोठ्या 3 हजार 606 ग्राहकांकडून 2 कोटी 6 लाख येणे आहे.

दोनच पर्याय 
वीजबिलाची नियमित वसुली किंवा थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यासारखे दोनच पर्याय ’महावितरण’पुढे असल्याचे सांगितले जाते. अनेक ग्राहक नियमित बिल भरत नसल्याने महावितरणचा आर्थिक ताळेबंद विस्कळित झाला आहे. महावितरणचा वीजपुरवठा व वसुली आढावा आता फिडरनिहाय (वीज वाहिनी) होत असल्याने बिल वसुली कमी असलेल्या व वीज चोरीचे प्रमाण असलेल्या वीज वाहिन्यांच्या कार्यक्षेत्रात ऐन दुष्काळात लोडशेडिंगचे संकट दिसू लागले आहे.