८५ व्या वर्षी ‘त्या’ करताहेत चित्रपट सृष्टीत पदार्पण

सामना ऑनलाईन । मुंबई

वयाची ८५… पण मनाने मात्र अगदी तरुण. घरी बसून स्वस्थपणे आराम करायच्या वयात एका आज्जीबाईंनी चक्क बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या आगामी ‘रेड’ या चित्रपटात या आज्जीबाईंची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पुष्पा जोशी असे या आज्जींचे नाव असून त्या मूळच्या पुण्याच्या आहेत.

दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांच्या ‘रेड’ या चित्रपटात पुष्पा जोशी या सौरभ शुक्लांच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. पुष्पा जोशी यांचे वय जास्त असल्याने त्यांना सेटवर कसलाही त्रास होऊ नये म्हणून अजय देवगणने त्यांची पुरेपुर काळजी सेटवर घेतली आहे. पुष्पा जोशी या पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत असल्या तरी त्यांचा अभिनय हा मोठ्या कलाकारांना देखील लाजवेल असा आहे. तसेच त्या मोठ्या उत्साहात सेटवर काम करत असतात. पुष्पा जोशी यांच्या काम करण्याच्या इच्छेमुळे अजय देवगण देखील प्रभावित झाला असून तो त्यांना काही अडल्यास तत्परतेने मदत करत असतो.

पुष्पा जोशी या फार हसमुख आहेत. त्या सतत सेटवर विनोद करत असतात. त्यांच्यामुळे सेटवरचं वातावरण प्रसन्न राहतं. सेटवरची तरुण मंडळी त्यांचा उत्साह बघून खूष होतात, असे कास्टिंग दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी सांगितले. अजय देवगणचा रेड हा चित्रपट येत्या १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.