दिल्लीतील हॉटेलला आग; आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू

16
bike-fire-pic


सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीतील करोलबाग परिसरात असलेल्या अर्पित हॉटेलला पहाटे 4 च्या सुमारास आग लागली. या आगीपासून जीव वाचवण्याच्या नादात अनेकांनी 4 थ्या मजल्यावरून उड्या मारल्या. धूराने घुसमटल्याने, होरपळल्याने आणि उंचावरून उड्या मारल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 9 च्या सुमारास मृतांचा आकडा 9 होता, जो वाढत आत्तापर्यंत 17 पर्यंत पोहोचला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

पहाटे लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 27 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. ज्यावेळी आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये 120 जण वास्तव्यास होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर अग्निशमन दलाला हॉटेलमध्ये असलेले मृतदेह सापडायला सुरुवात झाली. मृतांपैकी बहुतांश लोकांचा मृत्यू हा गुदमरून आणि होरपळून झाला आहे. आग लागल्यानंतर वेळेत बाहेर पडता न आल्याने या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.

हे हॉटेल पाच मजल्याचे आहे. या हॉटेलमध्ये वर्मा कुटुंबातील 8 जणांचा गट वास्तव्यास आला होता. यातील दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 17 मृतांपैकी 13 जण दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात आणण्यात आलं होतं, मात्र या सगळ्यांना मृत घोषित करण्यात आलं. लेडी हार्डींग रुग्णालयात आणण्यात आलेल्या 4 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या