एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ९ महिन्यांची प्रसुती रजा!

सामना प्रतिनिधी । नागपूर

एसटीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी परिवहन खात्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांची प्रसुती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसुती काळात मिळणाऱ्या हक्काच्या ६ महिन्यांच्या रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा देण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

मातृत्त्व कोणत्याही स्वरुपात हिरावून घेतलं जाऊ नये, त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. एसटी मंहामंडळाने या निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे.

सरकारी नियमानुसार एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची प्रसुती रजा दिली जाते. ती रजा कधी घ्यायची हा संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा निर्णय असतो. अनेकदा महिला वर्ग बाळाच्या जन्मानंतर या रजेचा वापर करतात. मात्र प्रसुतीपूर्व रजा मिळत नसल्याने महिला कर्मचाऱ्यांना गरोदर अवस्थेत प्रवास करावा लागतो. या पार्श्वभुमीवर अतिरिक्त ३ महिन्यांची प्रसुती रजा देण्यात आल्याने एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. परिवहन खात्याने घेतलेल्या या निर्णयाचे एसटीतील महिला कर्माचाऱ्यांनी स्वागत केले आहे.