बाबासाहेबांच्या स्मारकातून 90 कोटींचा महसूल मिळेल,MMRDA ची माहिती

सामना ऑनलाईन, मुंबई

दादरच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महाराष्ट्राच्या पर्यटनात भर घालणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून सरकारला वर्षाकाठी 90 कोटींचा महसूल मिळेल अशी माहिती एमएमआरडीएच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

सुमारे 700 कोटी रुपये खर्च करून इंदू मिलच्या जागेवर राज्य सरकारतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार मात्र स्मारकावर कोटय़वधी रुपये उधळीत आहे. त्यामुळे या स्मारकाचे काम थांबविण्यात यावे या मागणीसाठी भगवनजी रय्यानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या जागेवर रुग्णालय अथवा शैक्षणिक केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एमएमआरडीएच्या वतीने ऍड. सतीश तळेकर यांनी बाजू मांडताना सांगितले की या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याने लाखो पर्यटक येतील. त्यामुळे शासनाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळेल. स्मारकासाठी करण्यात येणारा खर्च वाया जाणार नाही.