दोन वर्षांची ९६४ बालके लसीकरणाशिवाय, सर्वेक्षणातून माहिती उघड

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील दोन वर्षांपर्यंतच्या तब्बल ९६४ बालकांनी कोणतेही लसीकरण केले नसल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये २० हजारांवर बालकांनी अर्धवटच लसीकरण केले आहे. त्यामुळे या बालकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेने ‘मिशन इंद्रधनुष्य’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ९ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण मुंबईभरात विशेष लसीकरण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील सर्व बालकांना वर्षभरात मोफत लसीकरण केले जाते. मात्र काही झोपडपट्ट्यांमधील मुले, कामानिमित्त निवासी जागा बदलणारे मजूर, आदिवासी, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांमध्ये हे लसीकरण होत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पालिकेमार्फत सप्टेंबर महिन्यात संपूर्ण मुंबईत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शेकडो मुलांनी कोणतेही लसीकरण केले नसून १९,५१५ बालकांनी अर्धवट लसीकरण केल्याचे समोर आले आहे. यावेळी उपायुक्त सुनील धामणे, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी शांताराम नाईक, डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर, कर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉ. परेश कंथारिया आदी उपस्थित होते.

लसीकरण कार्ड ‘आधार’शी जोडणार
मुंबईतील अनेकजण कामानिमित्त स्थलांतर करीत असल्यामुळे संबंधित मुलांचे पुढील लसीकरण होत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी काळात माता-बाळाचे लसीकरण कार्ड लवकच ‘आधार’ कार्डशी लिंक करण्याचा मानस यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यामध्ये कार्डवर १५ अंकी डिजिटल क्रमांक दिला जाईल. या मुलाने कुठेही लसीकरण केले अथवा नाही केले तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱयाला त्याची माहिती मिळेल. त्यामुळे आगामी काळात एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही असा विश्वास अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.