९९ टक्के जुन्या नोटा पुन्हा परत आरबीआयकडे, वार्षिक अहवालात दावा

सामना ऑनलाईन । मुंबई

नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या ९९ टक्के नोटा या परत आरबीआयकडे आल्या आहेत, असा दावा आरबीआयने आज वार्षिक अहवालात केला. केंद्राने नोव्हेंबर २०१६ नोटाबंदी करून ५०० आणि १००० नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्याचे एकूण मूल्य १५.४४ लाख कोटी एवढे होते. त्यापैकी १५.२८ लाख कोटी जुने चलन हे परत आल्याचा दावा आरबीआयने केला असून नोटाबंदीचा उद्देश सफल झाल्याचा दावा वार्षिक अहवालाच्या माध्यमातून केला जात असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र ६३२.६ कोटींच्या एक हजार रुपयांच्या नोटांपैकी ८.९ कोटींच्या जुन्या नोटा अद्याप परत आलेल्या नाहीत. याचा अर्थ १.४ टक्के नोटा अद्यापही बँकिंग प्रणालीच्या बाहेर आहेत. मग असे असताना आरबीआयने ९९ टक्के जुन्या नोटा परत आल्याचा दावा कशाच्या जोरावर केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान नोटा छपाईचा खर्चही या आर्थिक वर्षात दुप्पट झाल्याची माहिती आरबीआयने दिली.२०१६-१७ या वर्षात नोटा छपाईचा खर्च ७ हजार ९६५ कोटी रुपये झाला आहे, जो २०१५-१६ या वर्षात ३ हजार ४२१ कोटी रुपये एवढा होता.