एक कोटीच्या खंडणीसाठी चुलतभावाचं अपहरण आणि हत्या

2
death-suicide

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी स्वतःच्या चुलतभावाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना दिल्ली येथे घडली आहे. साहिल (१७) असं या दुर्दैवी मुलाचं नाव असून त्याचा चुलतभाऊ पंकज मेहरा (२५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

साहिल आणि पंकज एकाच कॉलनीत राहतात. २९ मे रोजी साहिल पंकजसोबत घरातून बाहेर पडला. मात्र, रात्र उलटूनही तो परत न आल्यामुळे मेहरा कुटुंबीयांनी पंकजकडे विचारणा केली. मात्र, त्याने साहिल आपल्यासोबत नव्हता असा बनाव केला. वास्तविक त्याच दिवशी पंकजने चार साथीदारांच्या मदतीने साहिलचं अपहरण केलं होतं. इथे घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांना साहिलबाबत कळवलं. पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. पोलिसात तक्रार केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंकजने साहिलचे वडील संत मेहरा यांच्याकडे १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

मेहरा कुटुंबीयांनी खंडणीसाठी आलेला फोन क्रमांक पोलिसांना दिला. त्यावरून पोलिसांनी माग काढत पंकजला अटक केली. पंकजच्या अटकेमुळे मेहरा कुटुंबीयांना धक्का बसला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पंकजने आपला गुन्हा कबूल केला. २९ मे रोजी साहिलसोबत घराबाहेर पडल्यानंतर चार जणांच्या मदतीने पंकजने त्याचं अपहरण केलं. मात्र, आपलं अपहरण आपल्या चुलतभावानेच केल्याचं साहिलला कळून चुकलं. साहिलला जिवंत सोडलं तर तो आपल्यासाठी धोकादायक ठरेल, या भीतीपोटी पंकजने झोपेच्या गोळ्या खायला घालून साहिलची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह मुरादनगर येथील नाल्यात फेकून दिला. घरी येऊन त्याने साहिल आपल्यासोबत नसल्याचा बनाव केला.

मात्र, खंडणीच्या फोनमुळे तो फसला. पोलिसांनी फोनचा माग काढला आणि ते पंकजपर्यंत पोहोचले. पंकजचं नुकतंच लग्न झालं होतं. पण, तो बेरोजगार असल्यामुळे आर्थिक तणावाचा सामना करत होता. साहिलच्या वडिलांनी पंकजला अनेकदा आर्थिक मदतही केली होती. पण, पैशाची हाव सुटलेल्या पंकजने साहिलचा काटा काढला. पोलिसांनी पंकजविरुद्ध गुन्हा नोंदवला असून साहिलच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या