मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड


सामना प्रतिनिधी, नांदेड

मुलींची तस्करी करुन त्यांना मध्य प्रदेशमध्ये विक्री करणाऱ्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मुलींची मध्यप्रदेशमध्ये विक्री केल्याप्रकरणी मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील विठ्ठल दत्तराम राखोंडे (४०) याच्या विरोधात भोकर पोलीस ठाण्यात गुरंन १८८/१७ कलम ३६३, ३६६, ३४२, ३७६ आदी विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

सदर आरोपी हा नांदेड येथे आला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे व पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे, राजू पांगरेकर, बालाजी सातपूते, तानाजी येळगे, शेख जावेद, विजय आडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाहू, रमेश खाडे, पोना. दारासिंग राठोड, घुंगरुसिंग टाक यांच्या पथकाने शहरातील शिवाजी पुतळ्याजवळून आरोपी विठ्ठल राखोंडे याला जेरबंद केले.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता साथीदाराच्या मदतीने आमदरी येथील एका मुलीची मध्यप्रदेश येथे विक्री केली असल्याची कबूली राखोंडे यांनी दिली. आरोपीच्या कबुलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने आरोपी विठ्ठल राखोंडे यास पुढील कारवाईसाठी भोकर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईबद्दल विनोद दिघोरे यांच्या पथकाचे पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.