नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल्स करून शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ


सामना ऑनलाईन । बेंगळुरू

नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल्स, अश्लील फोटो पाठवून शिक्षकच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करत असल्याची संतापजनक घटना बेंगळुरू येथे घडली आहे. विद्यार्थिनी 19 वर्षांची असून विवाहित आहे. बीएच छेन्ने गौडा असं या विकृत शिक्षकाचं नाव आहे.

बेंगळुरू मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता ही मूळची तुमाकुरू येथील रहिवासी आहे. तर गौडा हा तुमाकुरू येथील शाळेत नववीच्या वर्गावर गणित विषय शिकवतो. पीडित तरुणीलाही त्याने गणित शिकवलं आहे. विवाहानंतर पीडिता तिच्या पतीसोबत बेंगळुरू शहरात वास्तव्याला आली. तिने आपल्या सासूच्या मोबाईल फोनवरून एक फेसबुक अकाउंट बनवलं. तेव्हा गौडाने तिला हाय असा मेसेज केला. मेसेजला रिप्लाय नसलेला पाहून त्याने फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून तिला कॉल केला. मात्र तिने तो कट केला. त्यानंतर त्याने तिला मेसेज पाठवायला सुरुवात केली. मेसेजला रिप्लाय येत नाहीत असं पाहून गौडाने अश्लील फोटो पाठवायला सुरुवात केली.

या सगळ्याकडे पीडितेने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. मात्र, यामुळे त्याची हिंमत वाढली आणि त्याने तिचा नंबर मिळवला. नंबर मिळवल्यानंतर त्याने तिला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करायला सुरुवात केली. या कॉल करतेवेळी तो संपूर्ण विवस्त्रावस्थेत असे. त्याचा त्रास असह्य होऊ लागल्यानंतर पीडितेने त्वरित पोलीस स्थानक गाठत त्याच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पुरावे तपासत त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.