उबर चालकाचे पैसे चोरताना मुलगी कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन

उबर चालकाने महिलांसोबत गैरव्यवहार केल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील पण इथे एका तरुणीने उबर चालकाला गंडा घातल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. १८ वर्षीय तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीने आपण हे पैसे परत करण्याच्या वायद्याने घेतल्याचा दावा केला आहे. गॅब्रिएल (गॅबिटा) कैनालेस असे या तरुणीचे नाव आहे. डेली मेले याबाबत वृत्त दिले आहे.

गॅब्रिएलने ऑगस्टमध्ये एक उबर टॅक्सी बुक केली होती. व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आणखी दोन व्यक्ती बसल्याचे दिसत आहे. काही वेळ टॅक्सी चालल्यानंतर चालक मोहम्मद एच. भुईया गाडी थांबवतो, मात्र गाडी थांबताच मागे बसलेली गॅब्रिएल टीप बॉक्समधील पैसे चोरी करताना दिसते. गॅब्रिएलची चोरी निदर्शनास आल्यानंतर मोहम्मद तिची पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो, मात्र तोपर्यंत ती रफुचक्कर झालेली दिसते.

चालक मोहम्मदने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर गॅब्रिएलची ओळख पटली. त्यानंतर उबर कंपनीने मोहम्मदला गॅब्रिएलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र काही कारणास्तव त्याने तसे केले नाही.