घोड्यावर वाघ आणि सिंहिणीचा हल्ला, थरारक व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनच्या हेगई प्रांतामध्ये सर्कसच्या तंबूमधील एक थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. वाघ आणि सिंहिणीचा घोड्यावरील हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सर्कस सुरू असताना हा हल्ला झाल्याने प्रेक्षकांची दातखीळ बसली होती.

सर्कसमध्ये खेळ सुरू असताना रिंगमध्ये अचानक आलेल्या पांढऱ्या घोड्यावर वाघ आणि सिंहिणीने जोरदार हल्ला केला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी घोड्याचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. घो़ड्याला वाचवण्यासाठी रिंगमास्टर आणि सर्कसमधील कर्मचारी धावून आले. रिंगमास्टर वाघ आणि सिंहिणीवर चाबकाच्या फटक्यांचा मारा करत होता मात्र सिंहीण आणि वाघ घोड्याला चावा घेतच होते. अखेर दोन्ही रिंगमास्टरनी या घोड्याची वाघ आणि सिंहीणीच्या तावडीतून सुटका केली. घोड्यावरील वाघ आणि सिंहिणीच्या हल्ल्यामुळे मनोरंजनासाठी आलेले प्रेक्षक मात्र चांगलेच हादरून गेले.

सर्कसमध्ये जंगली प्राण्यासोबत अतिशय क्रूर व्यवहार केला जात असल्याने त्यांनी हल्ला केला असावा असे चीनमधील पेटाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.