संसदेत ‘त्या’ने घातली प्रेयसीला मागणी


सामना ऑनलाईन । लंडन

सर्वसाधारणतः संसद म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती अधिवेशनं, त्यातली प्रश्नोत्तरं, भाषणं आणि गदारोळसुद्धा. पण, जर संसदेत प्रेमाचा गुलाबी रंग फुलला तर? ही अशक्य वाटणारी घटना झाली आहे इंग्लंडच्या संसदेत. इंग्लंडच्या संसदेत एका व्यक्तीने एका महिलेला लग्नाची मागणी घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

या माणसाचं नाव मॅथ्यू रेविले असं असून त्याने संसदेच्या सभागृहातच ३२ वर्षीय रशॅल इवान हिला लग्नाची मागणी घातली आहे. इवान इंग्लंडच्या संसदेतील एक कर्मचारी आहे. तर, मॅथ्यू एक सरकारी कर्मचारी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू इवानला मागणी घालण्यासाठी एका चांगल्या ठिकाणाच्या शोधात होता. पण, तशी कुठलीच जागा न मिळाली नाही. त्यामुळे संसद हे तिचं कामाचं ठिकाण असल्यामुळे मॅथ्यूने तिथेच तिला मागणी घालायचं ठरवलं.

त्याने इवानच्या एका सहकाऱ्याला सांगून इवानला संसदेत बोलवून घेतलं. आणि तिथेच तिच्यासमोर गुडघ्यावर बसत तिला मागणी घातली. इवाननेही त्याच्या मागणीला होकार दिला आणि तिथे उपस्थित असेल्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदनही केलं.