साहित्य संघाचे संस्थापक

>>सुरेंद्र तेलंग<<

मुंबई मराठी साहित्य संघ ही साहित्य व नाटय़क्षेत्रात गेली ८२ वर्षे अव्याहतपणे भरीव स्वरूपाची सांस्कृतिक कार्य करीत असलेली एक मान्यवर अशी संस्था आहे. या संस्थेच्या आरंभापासून तिच्या नावाशी जे एक नाव अतूटपणे जोडले गेले आहे ते म्हणजे डॉ. अ. ना. भालेराव. मराठी भाषेचा केंद्रबिंदू असलेल्या त्यावेळच्या गिरगाव भागात साहित्यविषयक चळवळीला उत्तेजन देऊन विविध उपक्रमांसाठी एखादे चांगले व्यासपीठ असावे या उद्देशाने डॉ. भालेराव यांनी जुलै १९३५ साली मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली.

डॉ. अमृत नारायण भालेराव यांचा जन्म १२ डिसेंबर १९०२ रोजी विठ्ठलभाई पटेल रोडवरील प्रभू निवास येथे सुखवस्तू व खानदानी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासून मैदानी खेळाचा नाद होता. क्रिकेट खेळावर त्यांचे अधिक प्रेम होते. त्यांना कुटुंबात बापू या नावाने संबोधित असत. डॉ. भालेराव हे लोकमान्य टिळकांचे निष्ठावंत अनुयायी होते. टिळकांच्या मृत्यूनंतर प्रतिवर्षी १ ऑगस्टला पुणे येथे भरणाऱ्या टिळकभक्तांच्या मेळाव्याला ते न चुकता जात असत.

लोकमान्यांचा आदर्श दृष्टीसमोर ठेवून त्यांनी आपली कार्यपद्धती ठरविली होती. डॉ. भालेराव यांचा विवाह वयाच्या १६व्या वर्षी १९१८ साली झाला. १९१९ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले व १९२३ साली त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. वयाच्या १८व्या वर्षी १९२० साली विल्सन हायस्कूलमधून ते मॅट्रिक पास झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षणक्रम पूर्ण करून १९२५ साली त्यांनी पदवी मिळविली.

व्यवसायाने डॉक्टर असून नाटक, साहित्य, संगीत अशा स्वयंभू कलांच्या या प्रेमी माणसाने आपले आयुष्यच या कलांना दान केले. निःस्वार्थीपणे व ध्येयाने झपाटलेल्या वृत्तीने डॉ. भालेराव एक एक पाऊल उचलत सर्व प्रकारच्या पराक्रमाची पराकाष्ठा करीत. साहित्य संघ मंदिराची वास्तू तिची वीट न् वीट रचत उभारत गेले. त्यांची नाटय़भक्ती, कलाकारांबरोबरचा स्नेह, जिव्हाळा व त्यांच्या कलागुणांबद्दल आदर असे.

डॉ. भालेरावांनी तरुणपणी ‘अरविंद’ नावाचे मासिक काढले होते. तद्नंतर साहित्य संमेलने आणि साहित्य परिषदेशी त्यांचा निकटचा संबंध आला. भालेराव म्हणजे एक मराठी साहित्याची शक्तीच मुंबईत उभी होती.

१९३४ साली डॉ. भालेराव व त्यांचे सहकारी सर्वश्री भार्गवराम पांगे, बापूराव नाईक, अंधृटकर, शिवा चिखलीकर, तात्या आमोणकर, वा. ल. कुळकर्णी, वामनराव ढवळे यांनी साहित्य चळवळ सुरू केली. जुलै १९३५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली व डॉक्टर भालेरावांची प्रमुख कार्यवाह म्हणून नेमणूक करण्यात आली. ते अखेरपर्यंत साहित्य संघाचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते.

क्रीडा, साहित्य, नाटय़ यांसारख्या ललित प्रकृतीच्या क्षेत्रातील संघटन कार्याप्रमाणेच फडके गणपती मंदिर, ब्राह्मण सभा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, स्वतिक लीग इत्यादी संस्थांच्या अधिकारी पदांच्या जबाबदाऱ्या आपल्या शिरावर घेतल्या व त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.

१९३५ ते १९५५ या २० वर्षांच्या कालावधीत मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमीसाठी अनेक नाटय़ महोत्सव व व्याख्यानमाला आयोजित केल्या. तसेच अनेक कलावंत घडविले.

मराठी रंगभूमी, मराठी नाटक, नाटय़ कलावंत या सर्वांना डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच मानाचे स्थान व प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २००२ साली विशेषांक काढण्यात आला. त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने गिरगावातील केळेवाडीला (जेथे साहित्य संघ मंदिर आहे) डॉ. अ. ना. भालेराव मार्ग असे नामकरण केले आहे.