नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

पेडर रोड येथील जसलोक रुग्णालयाच्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये आज एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. नारायणी अवस्थी (२६) असे तिचे नाव असून मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. गावदेवी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

मूळची उत्तर प्रदेशची असलेली नारायणी २०१३ पासून मुंबईत आहे. ती जसलोक रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत होती. आज सकाळी तिने राहत्या खोलीतल्या बाथरूममध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे सकाळी नारायणी हिला तिच्या मैत्रिणींनी उठवले, मात्र बरे वाटत नसल्याचे सांगत तिने ट्रेनिंगसाठी जाण्याचे टाळले. ही बाब हॉस्टेलच्या महिला वॉर्डनला कळताच तिने नारायणीची भेट घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा जुलाब होत असल्याचे नारायणीने वॉर्डनला सांगितले.

त्यानंतर थोडावेळाने सफाई कर्मचारी त्या खोलीत गेली असता नारायणी बाथरूममध्ये होती. त्यावेळी या महिलेने बाथरूमचा दरवाजा ठोठावला असता नारायणीने आतून होकार दिला. पुन्हा अर्ध्या तासानंतर त्या महिलेने बाथरूमचा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने अन्य सहकाऱ्यांना सांगून दरवाजा तोडला असता नारायणी बाथरूममध्ये शॉवरला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.