पोलिसांमुळेच आयुष्याला कलाटणी

सामना ऑनलाईन । मुंबई

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हे घडल्यास आरोपींचा माग काढून तो गुन्हा उघडकीस आणणे. वर्दीतील पोलीस म्हणजे खडूस, अरेरावी करणार अशीच प्रतिमा प्रत्येकाच्या मनात पोलिसांबद्दल असते. पण वर्दीतील पोलीसही सामाजिक भान जपणारा आणि समाजासाठी झटणारा असतो. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलीस ठाण्यात आला. एका होतकरू बॉक्सिंग खेळाडूकडे टॅलेंट होते. एकापाठोपाठ एक स्पर्धेत ती पदके मिळवत होती, पण अडत होत ते फक्त पैशामुळे. साकीनाका पोलिसांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या माधवी गणबोरी हिला समाजासमोर आणले आणि सुरू झाला मदतीचा ओघ.

माधवी गणबोरी ही साकीनाका येथील झोपडपट्टी परिसरात राहते. वडिलांचा अपघातात मृत्यू झाला तर आई एका शाळेत प्यून म्हणून नोकरी करते. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. अशा परिस्थितीतही माधवीने घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमधून बीएमएसचे शिक्षण पूर्ण केले. तिला बॉक्सिंगचे प्रचंड वेड होते. कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने पदकेही पटकावली. कोलकाता येथे झालेल्या चेस, बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये माधवी हिने सुवर्णपदक पटकावले. माधवीकडे टॅलेंट होते, पण तिचा खर्च पेलवायचा कसा असा प्रश्न तिच्या आईला पडला होता.

माधवीबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी तिच्या आईला फोन केला. पोलीस ठाण्यातून फोन आल्याचे पाहून ती प्रचंड घाबरली. कोणत्याही चौकशीसाठी नाही तर मदतीसाठीच बोलाविल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. धर्माधिकारी यांनी विविध सामाजिक संस्थांपुढे माधवीचे टॅलेंट आणि तिची घरची परिस्थिती ठेवली. लाखो रुपयांच्या मदतीसाठी हात पुढे आले. माधवीला एमपीएससी परीक्षेला बसायचे असून त्यासाठीदेखील मदत करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. पोलिसांमुळे माझ्या मुलीच्या आयुष्याला चालना मिळाल्याचे माधवीच्या आईने सांगितले.