आई रागावल्याने १४ वर्षीय मुलीने घेतला गळफास

सामना प्रतिनिधी । हडपसर

घराबाहेर पडू नको असे वारंवार सांगणाऱ्या आई-वडिलांचा राग मनात धरल्याने अवघ्या १४ वर्षाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे रविवारी दुपारी २.३०च्या सुमारास घडली. मुलीने आपल्या ४ वर्षीय धाकट्या भावा देखत गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मोनिका युवराज शिकरे (वय १४ रा. आदर्शनगर माळवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

मोनिका साधना विद्यालयांमध्ये इयत्ता ८ वीमध्ये शिकत होती. जास्त घराबाहेर फिरू नकोस, घरातच अभ्यास कर असे तिचे आईवडील तिला वारंवार सांगत होते. मात्र ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती. रविवारी तिचे आई -वडील तिला व तिच्या ४ वर्षे वयाच्या धाकट्या भावाला घरात ठेवून सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. या दरम्यान मोनीकाने आपल्या धाकट्या भावादेखत घरातील छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबीय दुपारी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तिचे वडील मार्केट यार्ड येथे टेम्पोवर काम करतात. तर आई ही गृहिणी आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सतिश उमरे करीत आहेत.