सियाचीनच्या जवानांसाठी ‘स्पेशल किट’ हिंदुस्थानातच तयार होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सियाचीनसारख्या बर्फाळ आणि डोकलामसारख्या पठारावर तैनात असलेल्या जवानांसाठी ‘स्पेशल किट’चे (अत्यावश्यक साधनांचा संच) उत्पादन देशातच करण्याच्या योजनेला लष्कराने अंतिम मंजुरी दिली आहे.

अत्यंत प्रतिकूल वातावरणात देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांचा गणवेश, झोपण्यासाठीचे साहित्य, काही खास उपकरणे यांचे उत्पादन देशात केले जाणार आहे. त्यामुळे किमान 300 कोटी रुपयांची बचत होईल, असे एका उच्चपदस्थ लष्कर अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या बर्फाळ प्रदेशातील जवानांसाठीची साधनसामग्री (एक्स्ट्रिम कोल्ड व्हेदर क्लोदिंग सिस्टीम) अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड येथून आयात केली जाते. त्यासाठी दरवर्षी सुमारे 800 कोटी रुपये खर्ची पडतात, अशी माहिती त्या लष्कर अधिकाऱ्याने दिली.

दोन श्रेणींत उत्पादन
16 ते 20 हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या जवानांना लागणाऱ्या बहुतांश साहित्याचे उत्पादन हिंदुस्थानात करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यात थर्मल इन्सोल, चष्मे, कुऱ्हाड, झोपण्यासाठीचे साहित्य, हिमस्खलनाची माहिती देणारे उपकरण, पर्वतारोहणासाठीच्या साहित्याचा संच यांचा समावेश आहे. त्यांचे उत्पादन दोन श्रेणींत करण्यात येणार आहे. पहिल्या श्रेणीतील ‘स्पेटल किट’ आणि उपकरणे 9 ते 12 हजार उंचीवर तैनात असलेल्या जवानांना देण्यात येतील तर त्याहून अधिक उंचीवर तैनात असलेल्या जवानांना दुसऱया श्रेणीतील स्पेशल किट आणि उपकरणे दिली जातील.

सियाचीन : जगातले सर्वाधिक उंचीवरचे युद्धक्षेत्र
सियाचीन हे जगातील सर्वात अधिक उंचीवरचे युद्धक्षेत्र असून त्याला तीन बाजूंनी पाकिस्तान आणि चीनने घेरलेले आहे. तिथे हिंदुस्थानी लष्कराच्या 150 पोस्ट असून 10 हजार जवान अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करीत आहेत. सर्वाधिक उंचीवरचे युद्धक्षेत्र असल्याने 1984 सालापर्यंत तिथे जवानांना तैनात केले जात नव्हते, पण 1984 सालात पाकिस्तानने तिथे आगळीक केल्यापासून हिंदुस्थानने जवानांना तैनात केले आहे. सियाचीन समुद्रसपाटीपासून 5 हजार 400 मीटरहून अधिक उंचीवर आहे.