ड्युटी संपली! वैमानिकाने मध्येच उतरवलं विमान, प्रवासी हैराण

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । वाराणसी

समजा तुम्ही विमानाने प्रवास करताय.. तुमच्या वैमानिकाने विमान मध्येच उतरवलं आणि म्हणाला ‘पुढे नेत नाही जा..’ तर काय पंचाईत होईल? असंच काहीसं झालंय दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत. वैमानिकाने ड्युटी संपली असं सांगून पुढे काम करण्यास नकार दिल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

स्पाईसजेट या विमान कंपनीचे एसजी ८४८० हे विमान दिल्लीहून पाटण्याला जात होतं. वाटेत हवामान बिघडल्यामुळे पायलटने ते वाराणसीमध्ये उतरवलं. काही वेळाने जेव्हा हवामान अनुकूल झालं तेव्हा प्रवासी हुशारले. पण, वैमानिकाने विमान चालवण्यास नकार देऊन प्रवाशांच्या उत्साहावर पाणी फिरवलं. पायलटच्या म्हणण्यानुसार, त्याच्या ड्युटीची वेळ संपली होती. त्यामुळे तो विमान उडवू शकत नव्हता.

हे विमान रात्री साडे आठच्या सुमारास निघालं होतं. वाटेत वाराणसीला उतरल्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागले. विमान कंपनीनेही या प्रकरणी हात वर केल्यामुळे प्रवाशांना वाट पाहण्याखेरीज काहीही गत्यंतर उरलं नाही. स्पाईसजेटनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.