बाराबंकीत पोलिसांच्या कारवाईत गर्भवती महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । बाराबंकी

बाराबंकीत दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या धाडीत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील मानपुरम कोहिया गावात अवैधरित्या दारू बनवण्याचे अड्डे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पोलिसांनी काही अड्ड्यांवर धाड टाकली आणि तीन आरोपींना अटकही केली. यापैकी एका अड्ड्याच्या शेजारी राहणाऱ्या रुची रावत नामक गर्भवती महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी छापा मारताना धक्काबुक्की केल्यामुळे जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

पोलिसांकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात महिलेचा मृतदेह आढळला तिथे पोलिसांनी धाड टाकली नव्हती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. जर या घटनेत पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं सूत्रांतर्फे सांगण्यात आलं आहे.