माजलगाव शहरात तरुण सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन । माजलगाव

माजलगाव शहरातील तरुण सराफा व्यापारी रामचंद्र सखाराम देशमुख (२८) यांनी आज शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर सराफा बाजार बंद ठेवण्यात आला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात मोठी सराफा बाजारपेठ आहे,तेथे मुख्य रस्त्यावर देशमुख यांचे रामचंद्र ज्वेलर्स हे दुकान आहे. सखाराम देशमुख यांचे हे दुकान असून त्यांचा लहान मुलगा रामचंद्र दुकानाचे व्यवहार पहात असे. गुरुवारी घरातील सर्व मंडळी पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते आणि घरी रामचंद्र एकटाच होता. शुक्रवारी सकाळी त्याने साडे सातच्या सुमारास घरातील चौकातील गजाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. या घटनेत त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या आकस्मिक आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून कारण अस्पष्ट आहे. या घटनेनंतर शहरात सराफा बाजार बंद ठेवण्यात आला.